कपडे धुताना अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

महिलेचा मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कपडे धुवत असताना चक्कर येऊन पाण्याच्या टपात पडल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालात मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रकाली परिसरातील १४ वर्षीय मुलीचा शनिवारी (दि. ६) सकाळी कपडे धुवत असताना पाण्यात चेहरा बुडून मृत्यू झाला. मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. वडिलांची तब्येत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, मुलीची आई त्यांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयात गेली होती. त्यामुळे आईचा रोजगार बुडू नये, यासाठी आई ज्या ठिकाणी धुणे-भांडीचे काम करत होती, त्या ठिकाणी मुलगी काम करण्यास गेली. सकाळी सव्वादहाच्या सुमारास मुलगी एका सदनिकेत कपडे धुवत होती. त्यावेळी ती अचानक चक्कर येऊन पाण्याच्या टबमध्ये पडली. चेहरा बुडाल्याने तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला. ही बाब उघड झाल्यानंतर फ्लॅटमधील रहिवाशांनी मुलीस तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनात संबंधित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत. मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिस तांत्रिक आणि वैज्ञानिक आधारे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post कपडे धुताना अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.