नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा राष्ट्रविघातक, विभाजनवादी असून, अल्पसंख्याक मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्याचा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला.
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भंडारी म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा, म्हणजे मुस्लिमांचा आहे, असा दावा २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरीबांकडील तुटपुंजी संपत्ती हिरावून घेतली जाईल. राजस्थानमधील बसवारा येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा हा कट उघड केल्यामुळे काँग्रेस आता भयभीत झाली असून, त्यांनी थटथयाट सुरू केला आहे. मात्र, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देशातील दलित, मागासवर्गीय, ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला असून, केवळ अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने या समाजाची कायम उपेक्षा केली आहे, असा आरोपही भंडारी यांनी केला. गरीबांच्या तुटपुंज्या संपत्तीवर डोळा असलेली ती संपत्ती काढून घेऊन अल्पसंख्य समाजात तिचे वाटप करण्याचा कट आखणारी काँग्रेस व प्रत्येक समाज घटकास संपत्ती निर्माण करण्याची संधी देणारी भाजप असा हा सामना आहे, असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, सरचिटणीस सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, रोहिणी नायडू, पवन भगूरकर आदी उपस्थित होते.
नाशिक, दिंडोरीच्या प्रश्नांना बगल
देशाच्या प्रश्नांवर काँग्रेसवर निशाणा साधणाऱ्या भंडारी यांनी दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांतील प्रश्नांबाबतीत मात्र कानावर हात ठेवले. दिंडोरीतील भाजप उमेदवाराला शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कांद्याच्या प्रश्नाबाबत सरकार उपाययोजना करत आहेत. काही प्रश्न कायम आहेत, संपलेले नाहीत, असे आश्चर्यकारक उत्तर त्यांनी दिले. तर नाशिकच्या उमेदवारीबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असे सांगत या प्रश्नावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
हेही वाचा –