चेहऱ्यावर स्प्रे मारून दागिने खेचले, महिलेविरोधात तक्रार

chain snaching,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नागरिकांकडील मोबाइल, दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार सुरू असून, एका घटनेत महिलेने दुसऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून सोन्याचे दागिने खेचून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत सावता माळी रोड परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर परिसरातील श्रद्धाविहार भागात राहणाऱ्या मानसी रजनीकांत पाठक यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. १७) सकाळी १०.४० वाजता हा प्रकार घडला. मानसी या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील संत सावता माळी रस्त्यावरून मोपेडने जात होत्या. त्यावेळी अनोळखी महिलेने त्यांच्या चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारला. यामुळे मानसी काहीशा गोंधळल्या. दरम्यान, काही क्षणात संशयित महिलेने मानसी यांच्या हातातील अंगठी व कानातले २२ हजार ३०० रुपयांचे दागिने काढून घेत पळ काढला. भरदिवसा हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस महिला चोराचा शोध घेत आहेत.

शहरात घटनांमध्ये वाढ

शहरात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी नागरिकांकडून मोबाइल, सोन्याचे दागिने खेचून नेले आहेत. या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. पोलिसांनी काही चोरटे पकडले, तरी हे प्रकार सुरू आहेत. चोरट्यांनी शहरातील कॉलनी रस्ते टार्गेट केल्याचे चित्र असून, वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून ठेवत किंवा भीती दाखवून किमती ऐवज चोरून नेल्याचेही प्रकार घडले.

हेही वाचा :

 

The post चेहऱ्यावर स्प्रे मारून दागिने खेचले, महिलेविरोधात तक्रार appeared first on पुढारी.