नाशकात डेंग्यू बाधितांची हजारी

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशकात डेंग्यूच्या साथीचा मोठा उद्रेक झाल्याचे चित्र असून नोव्हेंबरच्या महिनाभरातच विक्रमी २३२ नवे रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांचा एकूण आकडा आता ९८७ वर पोहोचला आहे. कामटवाडे परिसरात आणखी एका रुग्णाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याने बळींचा आकडा वाढत आहे.

पावसाळा सरल्यानंतरही नाशकात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे. प्रशासकीय राजवटीत डास निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्यामुळे डेंग्यू आजार फैलावणाऱ्या डासांची पैदास वाढल्याने साथ नियंत्रणात अडचणी येत आहेत. जानेवारी- जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात डेंग्यूचे अवघे १४४ रूग्ण होते. ऑगस्टपासून डेंग्यूचा प्रादूर्भाव वेगाने वाढत गेला. या महिन्यात डेंग्यूचे ११७ नवीन रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची विक्रमी लागण होऊन २६१ जण पॉझिटीव्ह आढळले. ऑक्टोबरच्या कडक उन्हात डेंग्यूचा प्रादूर्भाव कमी होईल, अशी अपेक्षा असताना साधारण १३०० संशयित तर साधारण दीडशे बाधीत रूग्ण आढळले.

दरम्यान, ऑक्टोबरनंतर बऱ्यापैकी पावसाने उघडीप घेतली होती. मागील तीन ते चार दिवसाचा अपवाद वगळता पावसाचा थेंबही नव्हता. मात्र, डेंग्यु बाधितांचा वाढता आकडा मलेरिया विभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. नोव्हेंबरच्या गेल्या २८ दिवसात तब्बल २३२ डेंग्यू बाधित आढळले असून, येत्या दोन दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा ९८७ वर पोहोचला आहे. दोन दिवसात तो हजाराच्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन नाशिक विभागातील कामटवाडे परिसरातील एका रुग्णाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेंग्यूबळींचा आकडा वाढला आहे.

जंतूनाशक पुरवठ्यातही घोळ?

डास निर्मूलनासाठी महापालिकेला जंतूनाशकांचा औषधसाठा पुरविणाऱ्या ठेकेदार आणि डास निर्मूलनाच्या ठेकेदाराचे साटेलोटे असल्याचा संशय आहे. डास निर्मूलनासाठी पर्याप्त औषधे न वापरताच पुरवठादार ठेकेदारापर्यंत पोहोचविली जात असून पुन्हा तीच औषधे खरेदी केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलेरिया विभागाकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे.

डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबविली जात आहे. मलेरिया पथकामार्फत घरोघरी जाऊन पाण्याचे साठे तपासले जात असून, डासांची पैदास असलेली ठिकाणे नष्ट केली जात आहे. जंतूनाशक फवारणी तसेच धूर फवारणी केली जात आहे.

-डॉ. नितीन रावते, प्रभारी मलेरिया अधिकारी

हेही वाचा :

The post नाशकात डेंग्यू बाधितांची हजारी appeared first on पुढारी.