नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर, त्र्यंबकेश्वरपाठोपाठ नाशिक शहरातही कारोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका युवकास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, रुग्ण आढळलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करत राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपायययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोनच दिवसात नाशिक शहरातही कोरोनाचे एक-दोन नव्हे तर एकाचवेळी तीन रुग्ण आढळून आले आहेत. महात्मानगरमधील ३२ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आढळून आली आहे.
सदर महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. महात्मानगर परिसरातीलच एक अन्य ४२ वर्षी महिलेला सर्दीचा त्रास झाला. अॅन्टीजेन चाचणीत सदर महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. अंबड परिसरातील २४ वर्षीय युवकही अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटीव्ह आढळून आला आहे. या दोन्ही रुग्णांना फारसा त्रास जाणवत नसल्यामुळे प्राथमिक औषधोपचारानंतर गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शहरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची झोप उडाली आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर
कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. अंबड मधील युवकाच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर अन्य रुग्णाच्या कुटुंबियांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी केली जात आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये फारसा त्रास जाणवत नसला तरी लागण होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
आयुक्तांनी घेतली बैठक
कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेत कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय व जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला असून बेड, ऑक्सिजनसह औषधोपचारांचीही सज्जता केली आहे.
दीड लाख अॅन्टीजेन कीट
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास त्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून शहरातील एकूण रुग्णालये, उपलब्ध बेड, ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट, चाचण्यांसाठी आवश्यक अॅन्टिजेन किटचा आढावा घेण्यात आला आहे. महापालिकेकडे दीड लाखांहून अधिक अॅन्टीजेन कीटचा साठा उपलब्ध आहेत. महापालिकेची रुग्णालये, दवाखाने तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या कीटचे वाटप करण्यात आले आहे.
सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात, शहरी प्राथिमक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे.
– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.
हेही वाचा :
- जीवाश्म इंधनाचे भवितव्य आणि विकास
- प्रेग्नंट जॉब एजन्सीच्या नावाने फसवणूक
- Happy New Year 2024 : नाशिककरांकडून नवर्षाचे जल्लोषात स्वागत
The post कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शहरात शिरकाव appeared first on पुढारी.