नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ८४ दिवस वय असलेल्या मुलीची पाच लाखांत विक्री करणाऱ्या आईसह दोन एजंट आणि मुंब्रा येथील नऊ संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर, नवजात बाळांच्या विक्रीचे रॅकेट नाशिकमध्ये सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी मुंब्रा आणि नाशिक पोलिसांकडून केली जात असून, या टोळीने आजपर्यंत किती मुलांची विक्री केली, याची माहिती खोदून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
मुंब्रा येथील संशयित सहिदा, साहिल व त्यांचे इतर सहकारी ८४ दिवस वय असलेल्या मुलीची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला 15 दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने बनावट ग्राहक तयार करून संबंधित एजंटशी संपर्क साधला असता, पाच लाख रुपयांमध्ये मुलीची विक्री करण्याचे डील झाले होते. मुंब्रा रेती बंदर येथे मुलीचा ताबा घेण्याचे ठरले गेले. मात्र, अगोदरच पोलिसांनी याठिकाणी सापळा रचत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयित दलाल साहिल उर्फ सद्दाम हुसेन मकबूल खास, साहिदा रफिक शेख, खतिजा सद्दाम खान (तिघे, रा. अमृतनगर, मुंब्रा), दलाल प्रताप किशोरलाल केशवानी (रा. उल्हासनगर), मोना सुनील खेमाने (रा. टिटवाळा), दलाल सुनीता सर्जेराव बैसाने, सर्जेराव बैसाने (दोघे रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांना तीन महिन्यांच्या मुलीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, बाळाची आई शालू कैफ शेख (रा. हॅप्पी होम कॉलनी), तृतीयपंथीय राजू मनोहर वाघमारे (रा. पंडित जवाहरनगर, मातंगवाडा, नाशिक) या दलालास नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर नाशिकमध्ये नवजात बाळांच्या विक्रीचे रॅकेट सक्रिय असून, ताब्यात घेतलेले संशयितच रॅकेट चालवित असल्याचा पोलिसांना संशय आहे. या संशयितांनी यापूर्वीदेखील नवजात बाळांची विक्री केली काय? याचा तपास पोलिस करीत असून, त्यादृष्टीने संशयितांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पथकातील अधिकारी चेतना चौधरी, प्रीती चव्हाण, एन. डी. क्षीरसागर, श्रद्धा कदम आदींकडून तपास केला जात आहे.
नाशिक-मुंब्रा-उल्हासनगर कनेक्शन
नवजात बाळ विक्रीचा प्रकार गेल्यावर्षी मे महिन्यात उघडकीस आला होता. या प्रकरणात महिला डॉक्टरसह पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या टोळीकडून २२ दिवसांच्या बाळाची विक्री सात लाख रुपयांत उल्हासनगर येथे केली जाणार होती. मात्र, पोलिसांनी हा डाव उधळून लावला होता. यावेळी परराज्यातील टोळींचादेखील त्यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. आता मुंब्रा येथे बाळाच्या विक्रीचा डाव पोलिसांनी उधळून लावल्याने, नाशिक-मुंब्रा-उल्हासनगर असे कनेक्शन पोलिसांकडून तपासले जात आहे. दरम्यान,शालू कैफ या महिलेने २९ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यासंदर्भातील एमसीपी कार्ड, माता बालसंरक्षक कार्ड आणि रुग्णालयातून घरी सोडल्याची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
हेही वाचा: