गळ्यात कांद्याची माळ घालून माहेरी शोभा बच्छाव यांचे जंगी स्वागत

शोभा बच्छाव www.pudhari.news

देवळा ; पुढारी वृत्तसेवा–  धुळे लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे देवळा येथे गुरुवारी दि. ६ रोजी स्वागत करण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार बच्छाव यांचा गळ्यात कांद्याची माळ घालून सत्कार केला. धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसने माजी राज्य मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली व त्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी पण झाल्या. नवनिर्वाचित खासदार बच्छाव यांचे माहेर देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील आहे. धुळे लोकसभा मतदार संघात त्या निवडून आल्याने तालुक्यातील जनतेने त्यांचे कौतुक केले आहे.

गुरुवारी दि. ६ रोजी देवळा येथे बच्छाव यांनी धावती भेट दिली. त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या नातेवाईक तसेच काँग्रेसच्या व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. उपस्थित शेतकऱ्यांनी कांद्याची माळ गळ्यात घालून बच्छाव यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी आपण जरी धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक आलो असलो तरी मी एक शेतकऱ्याची कन्या असल्याने मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे .निश्चितच आपल्या कारकिर्दीत कांदा व इतर शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी संसदेत मागणी लावून धरून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .

याप्रसंगी प्रा.हितेंद्र आहेर, दिलीप पाटील, डॉ. भास्कर सावंत, दिनकर निकम, रवींद्र आहिरे, स्वप्नील सावंत, अमोल देवरे ,नदीश थोरात, प्रदीप आहेर, बंडू आहेर ,डॉ दिनेश बच्छाव ,अरुणा खैरनार ,हेमलता खैरनार ,दिनेश अहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा –