नाशिक : आनंद बोरा
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यापासून प्रत्येक भक्ताला रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. नाशिकमधील आयटी इंजिनिअर जीवन जाधव यांनी चक्क पेन्सिलच्या टोकावर रामलल्लाची मूर्ती साकारत आपल्यातील कलेचे दर्शन घडवले आहे. १.५ सेंटिमीटर आकाराची ही मूर्ती बहुधा जगातील सर्वात लहान मूर्ती असावी. मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी ही मूर्ती साकारली आहे.
अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीसारखी हुबेहूब असलेली ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना पाच दिवस लागले. या मूर्तीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली असून, सर्वात सूक्ष्म मूर्ती बनविणारा कलावंत म्हणून जीवन जाधव यांचे नाव नोंंदविले गेले आहे. लहानपणापासून पेन्सिलशी आपली घट्ट मैत्री असून, नवीन शिकण्याच्या जिद्दीने पेन्सिल लीड कार्विंग करण्यास सुरुवात केल्याचे जाधव सांगतात.
एका पेन्सिलवर ए टू झेड अक्षरे
जाधव यांनी आत्तापर्यंत पेन्सिलच्या टोकावरील लीडवर महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, बाहुबली, अब्दुल कलाम, लालबागचा राजा साकारले आहेत. शंभरपेक्षा अधिक सूक्ष्म कलाकृती त्यांनी पेन्सिलच्या टोकावर कोरल्या असून, हादेखील एक जागतिक विक्रम ठरला आहे. अष्टविनायकदेखील त्यांनी साकारले. पेन्सिलबरोबरच खडूवरदेखील अनेक कलाकृती साकारल्या आहेत. एका पेन्सिलवर ए टू झेड २६ अक्षरांची वर्णमालाही साकारून त्यांनी विक्रम केला आहे.
आई-वडिलांचे मार्गदर्शन
निसर्ग, पक्षी हे त्यांचे आवडते विषय आहेत. फेसबुकतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेतदेखील त्यांनी आपल्या कलाकृती सादर करून अनेक बक्षिसे मिळविली. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना चित्रकार प्रफुल्ल सावंत आणि राजेश सावंत तसेच आई सुमन आणि वडील रामदास यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे जीवन जाधव सांगतात.
प्रत्येक व्यक्तीने एक छंद जोपासला पाहिजे. माझ्या या कलेने मला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. छंदातून करिअरदेखील सापडते. मी तयार केलेल्या पेन्सिल लीडवरील अयोध्येतील प्रभू रामाची मूर्ती, अष्टविनायक मूर्ती साकरल्याचा मला अभिमान आहे. – जीवन जाधव, कलावंत.
हेही वाचा:
- जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; तब्येत खालावली, उपचारास नकार
- तालुका क्रीडा संकुल सुस्थितीसाठी विशेष लक्ष द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
- शिक्षक भरतीसाठी आज प्राधान्यक्रमास शेवटची संधी
The post गिनीज बुकमध्ये नोंद : लीड कार्विंगचा प्रयोग; मायक्रोस्कोपचा घेतला आधार appeared first on पुढारी.