पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप

पंचवटीला छावणीचे स्वरुप www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकासह राज्य सुरक्षा यंत्रणा व पोलिसांसह विविध यंत्रणांनी पंचवटीतील बहुतांश परिसरात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यामुळे पंचवटीतील तपोवन परिसरासह काळाराम मंदिर, रामकुंड, मोदी मैदान येथे छावणीचे स्वरूप आले आहे. येथे येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच रोड शो ची पोलिसांनी रंगीत तालिम घेतली. तर विविध विषयांवर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या व काहींना ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा यंत्रणांनी पंचवटी परिसराचा ताबा घेतला आहे. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेडिंग, नाकाबंदी करून खबरदारी घेतली जात आहे. पंचवटीतील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. पंचवटीतील रामतीर्थ परिसर व काळाराम मंदिर परिसराला पोलिसांच्या बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर, नीलगिरी बाग मैदान ते जनार्दनस्वामी मठापर्यंत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो होणार असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग केले आहे. मोदी मैदानाचा ताबा विशेष सुरक्षा पथकाने घेतला आहे.

गुरुवारी (दि.११) रोड शो ची रंगीत तालिम घेण्यात आली. त्यामुळे रोड शोसाठी किती कालावधी लागेल, कोणत्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त करावा लागेल याची उजळणी झाली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, तर केंद्रीय स्तरावरील विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीजी) अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी मैदानाची बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली.

पंतप्रधान दौऱ्यानिमित्त अनेक संघटना, विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांसाठी निवेदन देण्याचे, निषेध नोंदवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी खबरदारी म्हणून संबंधित पदाधिकारी, नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच काहींना ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० हून अधिक जणांना नोटीस बजावल्या आहेत. कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकऱ्यांनी नाराजी वर्तवली आहे. इतर कारणांमुळेही काही जण आंदोलन, निदर्शने करण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आंदोलकांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगाबाद रोडवरील नीलगिरी बाग चौफुली ते स्वामी जनार्दनस्वामी मठापर्यंत रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग केली आहे. या मार्गावर दुभाजकांची रंगरंगोटी आणि चौकांमध्ये झेब्रा पट्टे आखले आहेत. या मार्गावर पोलिसांनी गुरुवारी (दि.११) बंदोबस्त तैनात करून ताबा घेतला.

पंचवटीत करडी नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शन व आरतीसाठी जाणार आहेत. तसेच गोदाघाटावरही महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून या परिसरावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. काळाराम मंदिर परिसरात असलेल्या घरांची व त्या घरांमधील कुटुंबीयांची, व्यावसायिकांची माहिती संकलित केली आहे. गुरुवारी (दि.११) मध्यरात्रीपासूनच या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

The post पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप appeared first on पुढारी.