
जळगाव : पुढारी वृत्तसेवा मंत्री पदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा इथे विकासकामांचं उद्धाटन तसेच भूमीपूजन सोहळ्याचं आयेाजन करण्यात आलं होतं. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
सत्तेचा प्रयोग फसला असता तर…
शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचं आपण त्यांना सांगितलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी जायचं तर जा असं सांगितल्यानं आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठा चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रीपदाचा सट्टा लावत एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. सत्तेचा प्रयोग फसला असता तरीदेखील मी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असंही त्यांनी सांगितलं.
मराठा चेहरा लांब जातोय
आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून, तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हात जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
उद्धव ठाकरेही लॉकडाऊन होते
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. मात्र आता मूळ कामे सुरू झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारे एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊनमध्ये होते. स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
- ‘समृद्धी’नंतर आता शक्तिपीठ महामार्ग; असा असेल शक्तिपीठ एक्स्प्रेस वे
- BPCL’s crude oil : शिळफाटा स्फोटामागील कारण आलं समोर बीपीसीएलच्या क्रूड ऑईलची टॅपिंगद्वारे चोरी
- K. Kavita : ‘वॉशिंग पावडर…’ पोस्टरने अमित शहांचे स्वागत, के. कविता यांच्या ईडी चौकशीवरून संताप व्यक्त
The post गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट; मंत्री पदाचा सट्टा लावून आम्ही 'तो' निर्णय घेतला appeared first on पुढारी.