प्रकाश सोळंकेंना नव्या मंत्रिमंडळात संधी का नाही दिली?

जयंत पाटील, अजित पवार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असून, प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद मिळालं नव्हते, त्यामुळे ते नाराज होते, त्यावेळी अजित पवार यांनी मला न विचारताच त्यांना कार्याध्यक्ष करण्याचा शब्द दिला, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. जयंत पाटील यांनी सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला, पण तो पाळला नसल्याची टीका अजित पवारांनी पाटील यांच्यावर केली होती. त्याला पाटील यांनी आज प्रतिउत्तर दिले. दिंडोरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

पाटील म्हणाले की, अजित पवार यांची शरद पवार यांच्याशी वेळोवेळी चर्चा होत होती. मात्र, त्यात कुठल्या विषयावर चर्चा होत असे याबाबत कल्पना नव्हती. त्यांच्याशी झालेल्या चर्चेची आम्हाला माहिती दिली असती तर त्याच्यातील हे अंतर आम्ही पडू दिले नसते. तसेच मला न विचारता अजितदादांनी सोळंकेंना शब्द दिला. सोळंके यांना मंत्री व्हायचे होते, मी बीड जिल्ह्यातून सीनिअर आहे, मला मंत्री करा ही त्यांची अपेक्षा होती. त्यावर माझ्यासोबत सोळंके यांची चर्चा सुरू होती. तेव्हा अजित पवार त्या ठिकाणी आले आणि मला न विचारताच सोळंके यांना कार्याध्यक्ष बनवण्याचे आश्वासन दिले. त्यात आपला काहीच रोल नसल्याचा टोल लगावला. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात तरी अजित पवार यांनी सोळंके यांना संधी द्यायला हवी होती. ती का नाही दिली? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

काका-पुतण्यातील चर्चा दोघांनाच माहिती

पुण्यात एका व्यावसायिकाच्या घरी बोलावले होते. भाजपसोबत जाण्याचा आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता, तर मग आम्हाला बोलावले कशाला, असा सवाल अजित पवारांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ‘अशी कोणती बैठक झाल्याची मला माहिती नाही’. मी कोणत्याही व्यावसायिकच्या घरी बैठकीत उपस्थित नव्हतो, असे स्पष्ट करतानाच कोणी कोणाशी काय चर्चा केली ते चार महिन्यांनी सांगत असतील त्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला.

निवडणुकीसाठी ते स्वतंत्र

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवार उभे केले जाणार असल्याच्या प्रश्नांवर त्यांची चूल वेगळी आहे. त्यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवावी लागेल. त्यावर तक्रार करण्याची गरज नाही. मात्र, जनतेचा आशीर्वाद शरद पवारांना असल्याची प्रतिक्रिया यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

The post प्रकाश सोळंकेंना नव्या मंत्रिमंडळात संधी का नाही दिली? appeared first on पुढारी.