नामको’च्या २१ जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नाशिक मर्चंन्टस् को-आॅपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या २१ जागांसाठी तब्बल २७२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज विक्री व स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ६६ अर्ज दाखल केले गेले. दरम्यान, प्रगती आणि सहकार पॅनलच्या मुख्य नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडणुकीच्या आशा मावळल्या असून, निवडणूक अटळ असल्याचे बोलले जात आहे. माघारीनंतर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पॅनेल आमनेसामने उभे ठाकणार काय, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

शहर व जिल्ह्यातील व्यापारी बँक म्हणून नामको बँकेचा लौकीक आहे. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक चुरशीची होत असल्याने या निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर कोणकोणते पॅनल उभे ठाकणार याबाबत उत्सुकता होती. निवडणूक बिनविरोध व्हावी असाही काही सभासदांचा आग्रह होता. मात्र, गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने पुन्हा कंबर कसल्याने, सोहनलाल भंडारी, वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने यांच्या प्रगती पॅनलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान अर्ज विक्री व स्विकृतीनुसार १७८ सभासदांनी २७२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातूून १३८ सभासदांनी २१७ उमेदवारी अर्ज, महिला राखीव मतदार संघातून ३० सभासदांनी ३९ उमेदवारी अर्ज तर अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून १० सभासदांनी १६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

प्राप्त अर्जांची छाननी सोमावरी (दि.४) सकाळी ११ वाजता बँकेंच्या केंद्र कार्यालयात करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.५) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर अर्ज माघारीची मुदत ६ ते ११ डिसेंबर असेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी यांनी सांगितले. दरम्यान, २७२ मध्ये एका उमेदवाराकडून तीन किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज भरल्याने छाननीनंतर किती उमेदवार मैदानात असतील तसेच किती पॅनेलमध्ये थेट लढत होईल, हे स्पष्ट होणार आहे.

सत्ताधारी पॅनलसमोर पेच

सत्ताधारी प्रगती पॅनलमध्येही काही फेरबदल केले जाणार आहेत. मात्र, कोणास थांबवावे व कोणास संधी द्यावी असा मोठा पेच पॅनलच्या नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. तरुणांना संधी दिली जावी, अशी पॅनलची भूमिका असली तरी, ज्येष्ठ संचालक थांबण्यास तयार नसल्याची माहितीही समोर येत आहे.

बड्या नेत्यांकडून लॉबिंग

नामको बँकेच्या संचालक मंडळावर आपल्या कार्यकर्त्यांना पाठविण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांकडून लॉबिंग लावली जात आहे. विशेषत: सत्ताधारी प्रगती पॅनलमध्ये आपल्या समर्थकाला संधी दिली जावी, यासाठी संचालकांना या बड्या नेत्यांकडून फोन येत आहेत. अशात कोणास संधी द्यावी अन् कोणास थांबावावे यावर सध्या पॅनलच्या नेतेमंडळींमध्ये मंथन सुरू आहे.

हेही वाचा :

 

The post नामको'च्या २१ जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.