धुळे : पुढारी वृत्तसेवा- आतापर्यंत धर्माच्या नावाने निवडणूक लढवल्या गेल्या. मात्र यात जनतेचे प्रश्न बाजूला पडले. त्यामुळे आपण आता धुळे जिल्ह्यातील शिरपूर वगळता सर्व चार विधानसभेच्या जागा लोकसंग्राम संघटनेच्या माध्यमातून लढवणार आहोत. निवडणुका हे साध्य नसून लोकजागृतीचे साधन म्हणूनच जनतेपुढे जाण्याचा संकल्प लोकसंग्रामने केला आहे. हा संघर्ष देखील जनतेच्या सहभागातूनच पूर्ण होऊ शकेल. म्हणूनच आपण जनतेला ” वोट भी दो, नोट भी दो ” अशी साद घालून निवडणुका आदर्श पद्धतीने लढणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.
धुळे येथील लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी विविध प्रश्नांना हात घातला. यावेळी लोकसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाने, लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ, सलीम शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा मतदारसंघात आपण स्वीकारलेली जबाबदारी पार पाडली आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने शब्द, शपथा या फसव्या असतात. याचा पुन्हा अनुभव प्रचारादरम्यान आला. त्यामुळे आता लोकसंग्राम संघटनेने धुळे जिल्ह्यातील शिरपूर वगळता धुळे शहर, धुळे तालुका, साक्री, शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात धुळे शहर मतदार संघात आपण स्वतः निवडणूक लढवणार असून धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ब्लू प्रिंट घेऊनच मतदारांकडे जाणार आहे. केवळ विकासाच्या व शेतकऱ्यांच्या व पाण्याच्या प्रश्नावरच निवडणूक लढवण्याचा संकल्प आपण केला आहे. आतापर्यंत धर्म आणि जातीच्या आधारावर मतदान झाले. त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आता आली आहे. सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या संबंधित संस्था या अडचणीत आणण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. पुढार्यांच्या शैक्षणिक संस्था व अन्य संस्था यांचा विकास झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना जीवदान देणाऱ्या बाजार समिती, दूध संघ या अडचणीत आले आहेत. आपण याचा बारीकपणे अभ्यास केला असून अशा प्रकारची सैतानी वृत्ती राजकारणात कुठेही दिसून येत नाही. धुळे जिल्ह्यातून रेल्वेने दूध निर्यात केले जात होते. पण राजकारण करून धुळ्याची डेअरी संपवली गेली. पश्चिम महाराष्ट्रात त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या या संस्था तग धरून आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जागतिक बँकेची मदत घेण्यासाठी देखील आपण मागे पाहणार नाही. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय मिळतील, अशी व्यवस्था आपण करणार आहोत.
शेतकरी, माता-भगिनींचे तसेच तरुणांचे प्रबोधन
धुळे जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. येथील साखर कारखाने नेत्यांच्या भ्रष्टाचारात बुडून गेले. कारखानदार श्रीमंत झाले. पण ऊस उत्पादक शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला. सूतगिरण्यांमध्ये कापसापासून सूतही संपल्यात जमा आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या दूध डेअरी, सूतगिरण्या, साखर कारखाने बंद पडले. पण पुढाऱ्यांच्या मालकीच्या शिक्षण संस्थांमध्ये मात्र इमारतींचा विकास झाला. शेतकऱ्यांचे होते, त्यांचे दिवाळी निघाले. मात्र पुढार्यांच्या मालकीचे वैभव गगनाला जाऊन भिडले. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना हा फरक लक्षात आणून द्यावा लागेल. विधानसभेच्या दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे माता-भगिनींचे तसेच तरुणांचे प्रबोधन आपण करणार असल्याचे ते म्हणाले.
दोन गावांना जोडण्यासाठी बंधारे बांधणार
धुळे जिल्ह्यातून पांझरा, कान, बुराई, बोरी, या नद्या वाहतात. या नद्यांना पावसाळ्यात महापूर येतो. पण डिसेंबर अखेर सर्व नद्या कोरड्या पडतात. नद्यांच्या दोन्ही काठा लगत असलेल्या गावांमध्ये पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होत नाही. जनावरांना चारा मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण नदीच्या मध्ये दोन गावांना जोडण्यासाठी ब्रिज कम बंधारे बांधणार असून या नदीच्या उगमावर बांधलेल्या धरणातून या ब्रिज कम बंधाऱ्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जाणार असल्याची व्यवस्था करणार आहोत. यातून जमिनीत पाणी जिरेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. तसेच गुरांना देखील त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करता येईल. ग्रामीण जनतेच्या दुग्ध व्यवसायाचे पुनर्जीवन केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या उद्धाराचा अन्य कोणताही पर्याय दिसून येत नाही.
रेल्वे लाईन चा प्रश्न सोडवणार
जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी मनमाड इंदोर रेल्वे लाईन चा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नाचा अभ्यास नसलेल्या नेत्यांनी रेल्वे लाईन चा प्रश्न अडचणीत आणला, अशी टीका देखील त्यांनी केली. धुळे जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी ,अवैध धंदे ,अंमली पदार्थाचा धंदा यातून जनता त्रस्त झाली आहे. जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेला या सैतानी जोखडातून मुक्त करण्याच्या विषयावर आपण काम करणार आहोत. या सर्व प्रकाराचे मुद्दे घेऊन लोकसंग्राम आता जनतेमध्ये जाणार असून वोट भी दो और नोट भी दो, अशी साद जनतेला घालणार आहोत. निवडणुका पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी त्यात लोकसहभाग असणे आवश्यक आहे. आपल्या उपक्रमातून हाच प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा –