जयदत्त होळकरांच्या बंडाने भुजबळांसाठी बदलली समीकरणे

जयदत्त होळकर, छगन भुजबळ,www.pudhari.news

लासलगाव : राकेश बोरा

सन १९७२ मधील अमर-प्रेम या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेल्या “ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यूँ हुआ” गाण्याची आठवण भुजबळ यांना होत असेल त्याला कारणदेखील तसेच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी नेते अशी ओळख असणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्याच मतदारसंघात ४६ गावांतील मराठा समाजातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले जयदत्त होळकर यांनी सोडचिठ्ठी देत भुजबळ यांना आव्हान दिले आहे.

गेल्या वीस वर्षांपासून येवला-लासलगाव मतदारसंघात होळकर हे भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भुजबळ यांना ४६ गावातून चांगले मताधिक्य मिळवून देत होळकर यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. त्याचेच रिटर्न गिफ्ट म्हणून भुजबळ यांनी जयदत्त यांना मुंबई बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आणले होते. मात्र, असे काय झाले की भुजबळ यांची सावली म्हणून ओळखले जाणारे होळकर हे भुजबळांपासून दूर गेले? फक्त मराठा आरक्षणाला विरोध हे एवढेच कारण की अजून काही वेगळे कारण?

यंदाच्या लासलगाव बाजार समिती निवडणुकीत सभापती म्हणून भुजबळ यांनी होळकर यांना डावलत बाळासाहेब क्षीरसागर यांना संधी दिल्याने होळकर काहीसे नाराज होते. मात्र “आपलेच दात अन् आपलेच ओठ” अशी अवस्था झाल्याने योग्य वेळेची वाट बघत जयदत्त होळकर यांनी भुजबळ यांना जशास तसे उत्तर दिले. जयदत्त यांचे जितके वय, तितका राजकीय अनुभव असलेले भुजबळ यांना थेट विरोध करत आव्हान दिले. होळकर यांनादेखील भुजबळ यांच्या ताकदीचा अंदाज असताना त्यांना विरोध करण्यामागे मोठी राजकीय शक्ती असल्याच्या चर्चा उमटू लागल्या आहेत.

आयात करणारे आता विरोधात

येवला – लासलगावातील शिवसेनेचे आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव करण्यासाठी मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांचे वडील स्वर्गीय सीताराम होळकर, माणिकराव शिंदे आणि अंबादास बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घालत भुजबळ यांना येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला होता. मात्र, ज्यांनी भुजबळ यांना मतदारसंघात आयात केले तेच आता भुजबळ यांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे झाले आहेत.

राजकीय वारे फिरले

भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वारे फिरले आहेत. जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून होळकर यांनी भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत. येवला-लासलगाव मतदारसंघातील हनुमाननगर ग्रामपंचायतीने मराठा समाजाच्या आरक्षणावरून छगन भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध करत निधी न घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ब्राह्मणगाव विंचूर येथील मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळ आणि त्यांचे स्वीय सहायक यांना गावात प्रवेश बंदचा बॅनर लावला होता. सायगाव, गोरखनगर, बदापूर, नागडे, कातरणी, विसापूर, निमगाव वाकडा यासह अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणविरोधी पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आल्याचे बॅनर झळकले आहेत.

आगामी निवडणुकीत आव्हान

जयदत्त होळकर हे राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस आहेत. त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत होळकर पवार गटाकडून भुजबळ यांच्या विरोधात उभे राहून आव्हान देऊ शकतात. त्यामुळे लासलगावसह ४६ गावांतून मतांची गोळाबेरीज करताना होणार भुजबळांची दमछाक होणार आहे. भुजबळांच्या समर्थक मराठा पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकवल्याने भुजबळांची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा :

The post जयदत्त होळकरांच्या बंडाने भुजबळांसाठी बदलली समीकरणे appeared first on पुढारी.