जळगांव; पुढारी वृत्तसेवा : यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयात सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना एक विद्यार्थिनी कॉपी घेऊन फिरताना दिसली. यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरुन केंद्र प्रमुखासह चौघांच्या विरोधात कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल येथे गुरुवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू होता. या परीक्षा केंद्रावर फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या साहयक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी तपासणीसाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भेट दिली. त्यावेळी वर्गात तपासणी करीत असतांना त्यांना ब्लॉक क्रमांक ६ मध्ये एक विद्यार्थिनी कॉपीचा कागद वर्गाच्या बाहेर फेकतांना आढळून आली. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी थेट गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्रावरील परिक्षा केंद्रप्रमुख सहपर्यवेक्षकासह ४ जणांवर कारवाईचे आदेश दिले.
यानंतर यावल पोलीस ठाण्यात गटशिक्षण अधिकारी धनके यांच्या फिर्यादीवरून केंद्रावरील केंद्रप्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉक क्रमांक ६ चे पर्यवेक्षक एस. एस. सोनवणे, मुख्याध्यापक जी. एन. खान या चार जणांच्या विरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ७,८ कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार व पोलीस करीत आहेत.
The post जळगांव : दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी; केंद्र प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.