Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवारी (दि. २९) पारंपरिक व धार्मिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर रिमझिम पावसात उपस्थित हजारो मुस्लीम बांधवांचे नेतृत्व करीत ईदची विशेष नमाज अदा केली. तत्पूर्वी नूर मोहम्मद यांनी पैगंबर साहेबांवर आधारित स्तुतिकाव्य प्रस्तुत केले व मौलाना मेहबूब आलम यांनी ईद-उल-अजहाचे महत्त्व सांगितले. यावेळी देशात सुख-शांती, समृद्धी, प्रगती व एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली.

ढगाळ वातावरण असल्याने खतीब-ए-नाशिक यांनी 20 मिनिटे उशिरा नामजला सुरुवात केली. शेवटी खुतबा वाचन व सलातो सलाम नंतर मुख्य सोहळ्याची सांगता झाली. यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर दशरथ पाटील, पोलिस उपआयुक्त (विभाग १) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त (सरकारवाडा) सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक युवराज पत्की, भद्रकाली पाेलिस बंदोबस्त तैनात होता.

एकात्मतेचा संदेश

आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकत्रित आल्याने अद्वितीय एकात्मतेचे दर्शन घडले. अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांचा सन्मान करीत आषाढी एकादशी असल्याने कुर्बानी पुढे ढकलली. त्यामुळे ईदनंतर शिल्लक दोन दिवसांत कुर्बानी देण्यात येतील. तसेच दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने सोशल मीडियावर हिंदू-मुस्लीम दोघांनी एकमेकांना दोन्ही सणांच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : 

The post Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना appeared first on पुढारी.