जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक मन हेलावून देणारी घटना घडली आहे. वर्षभरापासून कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या मुलाचे लग्न डोळ्यांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुलाच्‍या हळदीच्‍याच दिवशी आईने अखेरचा श्वास घेतला. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी जड अंतकरणाने मुलाचे लग्‍न लावून आईची ईच्‍छा पूर्ण केली.

अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवाशी सरलाबाई गुलाब गुर्जर यांना कॅन्‍सरची लागण झाली होती. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. मात्र आपले डोळे मिटण्यापूर्वी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न पहायला मिळावे, अशी इच्छा सरलाबाई यांनी व्यक्त केली. यानुसार पती गुलाब गुर्जर व भाऊ राजेंद्र पाटील यांनी मुलगा राकेशसाठी मुलगी पाहून ठेवली. चोपडा तालुक्यातील मंगरुळ गावातील रोहिणी पाटील हिच्याशी राकेश याचा विवाह जुळला. त्‍यानुसार ३ मे रोजी हळद व ४ मेस विवाह सोहळा नियोजित केला होता. लग्न दोन दिवसांवर असताना आई सरलाबाईला अधिक त्रास जाणवू लागला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

व्हिडीओ कॉलवरुन बघितला हळदीचा कार्यक्रम…
मुलाचा हळदीचा कार्यक्रम त्यांनी व्हिडीओ कॉलवरुन बघितला. शेवटी मुलास हळद लागल्याचे पाहून आपली इच्छा पूर्ण झाल्याचे सांगत सरलाबाई यांनी आपला देह त्याग केला. डॉक्टरांनी सरलाबाईच्या निधनाची बातमी नातेवाईकांना दिली. केवळ निवडक नातेवाईकांना कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी नातेवाईकांनी छातीवर दगड ठेवून विवाह सोहळा पार पाडला. लग्नानंतर मुलगा राकेश याला कळल्यावर त्याने टाहो फोडत आई तुझी इच्छा पूर्ण केली. मात्र मला आताच तू कायमस्वरूपी सोडून गेली म्हणून हंबरडा फोडला. शेवटी वडील, काका व नातेवाईकांनी धीर देत सरलाबाईचा मृतदेह गावी आणून गावी अंत्यसंस्कार केले. या दुर्देवी घटनेने निम गावासह अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण appeared first on पुढारी.