जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

बाबा कोकणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातून तडीपार असलेला बाबा कोकणी याने न्यायालयातून जामिनावर सुटका होताच शुक्रवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्याने नाशिक मंडळाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लोकसभेची आचारसंहिता लागू असताना, कोकणी बिनदिक्कतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत असल्याचे चित्र आहे.

शहरातून तडीपार केलेल्या अब्दुल लतीफ यासीन कोकणी उर्फ बाबा (रा. २८१०, राजमहल बंगला, कोकणीपुरा, भद्रकाली) याने महसूल यंत्रणेच्या नाकीनऊ आणले आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नाशिक मंडळाधिकारी कार्यालयात गाेंधळानंतर पुन्हा एकदा कोकणी चर्चेत आला. त्यावेळी चार ते पाच तक्रारदारांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत काेकणीविरोधात तक्रार केली होती. दरम्यानच्या काळात तलाठी संघाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देत कोकणीकडून होणाऱ्या त्रासाची कैफियत मांडली होती. तलाठ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना कोकणीवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, न्यायालयातून जामीन मंजूर करून घेतल्यानंतर कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयातील वावर वाढला आहे.

नाशिक मंडळाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. १२) दुपारी 3 च्या सुमारास कोकणीने पुन्हा एकदा गोंधळ घालत यंत्रणेला वेठीस धरले. पोलिसांनी वेळीच येत कोकणीला ताब्यात घेतले. पण या गोंधळात लोकसभेची आचारसंहिता लागू असताना कोकणी शहरात फिरताेच कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा –

The post जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ appeared first on पुढारी.