जिल्हा गौणखनिज विभाग : प्रतिसादाअभावी पुर्नप्रक्रियेची वेळ

संग्रहित फोटो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील वाळूघाटांसाठी गौणखनिज विभागाकडून निविदाप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेमध्ये १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मागील अनुभव बघता जिल्ह्यातील वाळूघाटांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवेळी लिलावाची रक्कम २५ टक्के कमी करुन पुर्नप्रक्रिया राबविण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे.

जिल्हा गौणखनिज विभागाने बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यातील वाळू घाटांसाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारपासून (दि.६) घाटांसाठी अर्ज करता येणार असून १३ तारखेला दुपारीपर्यंत अंतिम मुदत असेल. तसेच १४ तारखेला दाखल निविदा उघडण्यात येणार आहेत. परंतु, घाटांच्या लिलावासंदर्भातील अनुभव बघता ठेकेदारांनी सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचे प्रमुख कारण हे जिल्ह्यातील वाळूची घसरलेली प्रतवारी असल्याचे सांगितले जाते. परंतू, प्रत्यक्षात गावांचा होणार विरोध, पर्यावरणीय परवानगी व घाटांमधील अत्यल्प वाळूसाठा या कारणांनी ठेकेदार लिलावात सहभागी होत नाहीत. त्यामुळे दरवेळी लिलाव प्रक्रियेनंतर घाटांची ऑफसेट किंमत २५ टक्क्यांनी कमी करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावते. यातून शासनाच्या तिजोरीलाही फटका बसतो. हा सर्व अनुभव गाठीशी असताना २०२४ मध्ये पहिल्यांदाच गौणखनिज विभागाने घाटांसाठी लिलाव करत आहे. त्याला कसा प्रतिसाद लाभतो हे १४ तारखेला निविदा उघडल्यानंतरच स्पष्ट होईल.

वाळू घाटांचे लिलाव असे…
बागलाण : धांद्री, नामपूर, द्याने,
कळवण : देसगाव, नाकोडे, कळवण ब्रु., वरखेडा, पाळे खुर्द.
देवळा : ठेंगोडा बंधारा
नांदगाव : न्यायडोंगरी
मालेगाव : पाटणे, चिंचावड, आघार खुूर्द, येसगाव बुद्रूक, सवंदगाव, सावतावाडी, वडनेर, वळवाडी, अजंग

लिलाव प्रक्रिया याप्रमाणे…
६ फेब्रुवारी : निविदा पूर्व बैठक (दुपारी ३ ला जिल्हाधिकारी कार्यालय)
६ फेब्रुवारी : निविदा स्विकृती
१३ फेब्रुवारी : निविदा भरण्याची अंतिम मुदत (दुपारी २ पर्यंत)
१४ फेब्रुवारी : निविदा उघडणे दुपारी २.३० वाजता

The post जिल्हा गौणखनिज विभाग : प्रतिसादाअभावी पुर्नप्रक्रियेची वेळ appeared first on पुढारी.