
नाशिक :पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी अतिदक्षता विभाग, बाह्य रुग्ण विभाग त्याचबरोबर बाल रुग्ण विभागाला भेट देत रुग्णांची चौकशी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व करण्यात आलेल्या बदलांबद्दल माहिती दिली. तृतीयपंथीय रुग्णांची अडचण समजून घेत जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. आठवड्याभरात हा कक्ष कार्यान्वित होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्ण विभाग त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. तृतीयपंथीय रुग्णांची अडचण समजून त्यासाठी निर्माण करण्यात येत असलेल्या स्वतंत्र कक्षाचीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर रेडिओलॉजी हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील या बदलांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे काैतूक केले असून पुढील काळात माता व बालसंगोपन विभाग देखील त्वरित कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना केल्या.
२०१७ साली तयार करण्यात आलेली जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारत ही कोरोना काळात वापरण्यात आली होती. त्यानंतर ही इमारत वापरात नव्हती. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या सूचनेनुसार या इमारतीचा वापर पुनश्च एकदा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा –
- China Earthquake: चीन हादरले; ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
- ‘समता पंधरवडा’निमित्त जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम
- Yellow alert : विदर्भात पुन्हा यलो अलर्ट, पंचनाम्याला आचारसंहिता अडचण नाही : डॉ. नीलम गोऱ्हे
The post जिल्हा रुग्णालयात तृतीय पंथीयाकरिता स्वतंत्र कक्ष appeared first on पुढारी.