ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावरच देशाचा कायापालट केला. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणायला हवा असे प्रतिपादन प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.के.डी.कदम हे होते. यावेळी विचार मंचावर वस्तीगृह अधीक्षक राजेंद्र शिंपी हे होते. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री सीताबाई चंदनमल जैन वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.सतीश मस्के म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी परदेशामध्ये जाऊनही शिक्षण घेतले. अठरा अठरा तास अभ्यास करून ज्ञानाची भूक भागवुन भारतीय संविधान लिहून समाजाची, राष्ट्राची व देशाची सेवा केली. कोलंबिया विद्यापीठात ‘ज्ञानाचे प्रतीक’डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आहे. ज्ञान हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया आहे. ज्ञानाशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीच जास्त अभ्यास करून आपली मने सुसंस्कारित केली पाहिजे. आई-वडिलांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या बळावरच पूर्ण करावीत. ज्ञानामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान लिहू शकले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य प्रा.के.डी.कदम म्हणाले की, मला चांगले शिक्षक मिळाले. माझी ही परिस्थिती नसताना मला शिक्षकाने शिक्षणाकडे वळवले. अभ्यास करण्यास सांगितले. त्यांचे ऐकून मी अभ्यास केला व आज तुमच्या पुढे प्राचार्य म्हणून उभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली जडणघडण ही अभ्यासाच्या बळावच करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार वसतिगृह अधिक्षक राजेंद्र शिंपी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील अमृतकर,सागर बहिरम व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा –

The post ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के appeared first on पुढारी.