दिंडोरीकरांच्या नजरा आकाशाकडे, सर्वच धरणांनी गाठला तळ

Water Scarcity www.pudhari.news

 दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यात सध्या सूर्यदेवता आग ओकत असल्याने तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील जनतेवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यात तालुक्यातील सर्वच धरणांनी आपला तळ गाठल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील जनतेच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ओझरखेड-पुणेगाव धरणामध्ये शून्य टक्के साठा आहे.

धरणातील सध्याचा पाणीसाठा (आकडे टक्क्यांत)

  • १) करंजवण : १४.९९
  • २) ओझरखेड : ००.००
  • ३) पुणेगाव : ००.००
  • ४) वाघाड : ३.९५
  • ५) तिसगाव : ०.२२
  • ६) पालखेड : ११. ६४

तालुक्यात धरणे असूनही सध्या सर्वच धरणांनी तळ गाठल्यामुळे दिंडोरीकरांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईची चर्चा सुरू आहे. तालुक्यातील धरणांचा साठा पाहिला, तर प्रत्येक धरण हे अत्यल्प स्थितीमध्ये पाहायला मिळतात. दिंडोरी तालुक्यात पूर्वीपासून पुरेसा पाऊस होतो. परंतु मागील काही वर्षांपासून पावसाने आपला लहरीपणा दाखवत कधी कमी, तर कधी जास्त हे समीकरण दाखवून दिले आहे. मागील वर्षी काही अंशी शेवटच्या टप्प्यात पाऊस बरसल्याने तालुक्यातील सर्वच धरणांनी शंभरीचा आकडा पार केला होता. दिंडोरी तालुक्यातील धरणांवर काही तालुक्यांचे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी राखीव असल्याने मागील काळात धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्या दिंडोरी तालुक्यावरच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

तालुक्यातील जनतेसाठी राखीव पिण्याच्या पाण्याचा साठा निर्माण केल्यास एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी धरणांतून पिण्यासाठी पाण्याची पाइपलाइन विविध ग्रामपंचायतींनी उपलब्ध करूनही पाणीटंचाईचे ग्रहण सुटत नाही. कारण धरणातच जर पाणी नाही, तर गावासाठी पाणी उपलब्ध कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे.

पाणीटंचाईवर एटीएमचा तोडगा

ग्रामीण व शहरी भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आता एनीटाइम वॉटर मशीन्स (एटीएम) ही पाणी वितरण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही योजना स्मार्ट कार्ड स्वयंचलित आहे. गावातील मध्य ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने काही अंशी पाणीटंचाईवर मात झाली आहे.

तेरा वर्षांनंतर ओझरखेडमधील पीरबाबांचे दर्शन

वणीपासून काही अंतरावर असलेले ओझरखेड धरण आता पूर्णपणे उघडे झाल्याने आता भाविकांना १३ वर्षांनी पीरबाबांच्या दर्शनाचा योग आला आहे. हे मंदिर कायम धरणातील पाण्यात राहात असल्याने ते लवकर उघडे पडत नाही. परंतु यंदा म्हणजे जवळपास १३ वर्षांनंतर हे मंदिर पाण्यातून बाहेर आल्याने भाविकांची दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यंदा पीरबाबांच्या जवळ जाऊन दर्शन मिळाल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. लवकर धरण भरू दे, म्हणून या पीरबाबाला भाविकांकडून साकडे घातले जात आहे.

हेही वाचा –