नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ की, शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हा पेच शुक्रवारीदेखील कायम राहिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांना पसंती दिल्याने तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांच्या नशिबी प्रतीक्षा कायम राहिली आहे. दरम्यान, महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम वाढू लागला आहे.
महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारही सुरू केला असताना महायुतीचा उमेदवार मात्र निश्चित होऊ शकलेला नाही. नाशिकच्या जागेसाठी भाजपचा आग्रह असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्याने भाजपचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यातच गोडसे यांनी उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर तब्बल दोन वेळा केलेले शक्तिप्रदर्शनही भाजपच्या निकषात बसत नसल्यामुळे यासंदर्भातील तक्रारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळेच नाशिकमधून महायुतीच्या उमेदवारीसाठी आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले असून, दिल्लीश्वरांचा आशीर्वाद भुजबळ यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी(दि.२८) शिंदे गटाने आठ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात सातव्या क्रमांकावर गोडसे यांचे नाव होते; परंतु गोडसे यांना उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हालचाली सुरू असल्याने त्यांचे नाव एेनवेळी यादीतून वगळण्यात आले, अशीही चर्चा आहे.
नाशिकची जागा आपल्याकडेच कायम राहावी यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न कायम असून, शुक्रवारी(दि.२९) सलग तिसऱ्या दिवशी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गोडसे मुंबईतच तळ ठोकून होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेतही त्यांनी चर्चा केली. परंतु चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. नाशिकच्या जागेसाठी भुजबळांच्या नावाचा दबाव वाढू लागल्याने गोडसे यांच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटू लागला आहे.
कोणता झेंडा घेऊ हाती?
महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढू लागला आहे. गेल्या वेळी ज्यांच्याविरोधात प्रचार केला, त्यांचाच झेंडा हातात घेण्याची वेळ राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांवर आणली आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वैतागले आहेत. उमेदवारीच्या संघर्षात महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्तेच आता आमने सामने उभे ठाण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे.
भुजबळ म्हणतात..
दिल्लीतून उमेदवारी निश्चित झाली आहे. यावर तुमचं मत काय? असे भुजबळ यांना विचारले असता, मला कल्पना नाही. अनेकजण इच्छुक आहेत. आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही. मी राष्ट्रवादी पक्षात, माझ्या पक्षातर्फे लढणार, पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. ज्या पक्षाला जागा सुटेल तो लढेल. ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला १०० टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, असे छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा :
- Hemant Godse | ‘एक हजार एक टक्के दुसऱ्या यादीत नाव येईल, मुख्यमंत्री भेटीनंतर गोडसेंचा दावा कायम
- Allu Arjun : पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा दुबईत स्टॅच्यू; पोझ दिली ‘फ्लावर नहीं फायर हैं हम’ ची
- Nashik Crime News | दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले
—————–
The post दिल्लीश्वरांचा कौल भुजबळांच्या पारड्यात? नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रयत्न appeared first on पुढारी.