धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे नाशिकच्या माजी महापौर व माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव या विजयी झाल्या. धुळेकरांनी सुमारे दोन दशकांनी भाजपला नाकारत काँग्रेसला संधी दिली. नाशिकमधून उमेदवार आयात केल्याचा मुद्दा उपस्थित करीत महायुतीने डॉ. बच्छाव यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीदेखील बच्छाव यांना मतदारांची साथ लाभली. धुळ्यातील यशानंतर नाशिक शहरातील काँग्रेस पदाधिकारी विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या दोन गोष्टींचा झाला फायदा
- धुळ्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्याने ती मते बच्छाव यांच्याकडे वळाली.
- त्याचप्रमाणे एमआयमए पक्षानेही येथे उमेदवार न दिल्याने बच्छाव यांची मते एकगठ्ठा राहीली.
सुमारे दोन दशकांपासून धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य होते. त्यामुळे हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी काँग्रेसला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने शेवटच्या क्षणी डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे इतर इच्छुक उमेदवार नाराज झाले. बच्छाव यांना सुरुवातीस पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागला. त्यातून माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश करीत डॉ. भामरेंना बळ दिले. त्यानंतरही इतर पदाधिकाऱ्यांनी व बच्छाव यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व एमआयएम या दोन पक्षांचे उमेदवार नसल्याने काँग्रेसचे हक्काचे मतदार एकगठ्ठा पक्षाच्या पाठीशी राहिले. त्यातून डॉ. बच्छाव यांना विजयास गवसणी घालता आली. त्यामुळे दोन दशकांनंतर धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला जिंकता आला.
नाशिक शहरातही हेच चित्र
सुमारे १५ वर्षांपासून शहरात काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकली नसून उमेदवारास दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर समाधानी राहावे लागत आहे. त्यास पक्षांतर्गत गटबाजी, मतदारांपर्यंत पदाधिकाऱ्यांचा संपर्क नसणे, पक्षाची विचारसरणी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणारे अपयश आदी कारणांमुळे शहरात काँग्रेसला अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातही दलित व मुस्लीम मतदार तसेच काँग्रेस विचारसरणीशी एकरूप असणारा मतदार आहे. मात्र मतदार वाढवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याने शहरात डॉ. बच्छाव यांच्यानंतर काँग्रेसचा उमेदवार विधानसभा निवडणूक जिंकलेला नाही. सध्याच्या लोकसभा निवडणूक निकालाच्या यशानंतर शहरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे या उत्साहास प्रयत्नांची जोड दिल्यास आगामी विधानसभा व मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्ष शहरात यश मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा –