धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी

धुळे महाशिवपुराण कथा तयारी,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळ्याच्या सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या 80 एकरात दि. 15 नोव्हेंबरपासून श्री शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र गुंजणार आहे. मध्यप्रदेशात सिहोर निवासी कथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा हे पाच दिवस शिव महापुराण कथा धुळेकर भाविकांना सांगणार आहे. या भक्ती पर्वणीच्या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रवाल विश्राम भवन येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवमहापुराण नियोजन समितीतील प्रमुख सदस्य, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी शिव महापुराण कथा कार्यक्रमासाठीची रुपरेषा मांडली. हिरे मेडिकल लगतच्या 80 एकर जागेत शिवमहापुराण कथेचा भक्तीचा मळा फुलणार आहे. याच ठिकाणी याआधी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. प्रविण अग्रवाल, विनोद मित्तल आणि आणखी एकाच्या मालकीची ही जागा आहे. धुळ्याचे माजी पालकमंत्री, शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी शिवमहापुराण कथेसाठी पंडित मिश्रा यांची तारीख उपलब्ध करुन दिली. या कथा सोहळ्यासाठी सुमारे अडिच ते तीन लाख भाविकांची उपस्थिती राहील, त्या दृष्टीने भव्य असे मंडप टाकण्यात येतील. पाणी, शौचालयाची व्यवस्था केली जाईल. कथा ऐकण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 हजार भाविक मुक्कामी राहतील. या भाविकांसाठी भंडार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे नियोजन सोयीचे व्हावे यासाठी अग्रवाल भवन हे मध्यवर्ती कार्यालय राहील. तसेच कथेच्या ठिकाणी देखील एक कार्यालय असणार आहे. गैरसोय होवू नये यासाठी 2 हजार स्वयंसेवकांनी आताच नाव नोंदणी केली आहे. भोजनासह विविध पंधरा समित्या गठीत करण्यात येत आहे. कथेची वेळ दुपारी 1 ते 4 ही दररोज राहील. शेवटच्या दिवसाची वेळ आदल्या दिवशी सांगितली जाणार आहे. कथास्थळी शंभर स्टॉल लावले जातील. अनेक जण भक्ती भावाने भाविकांसाठी चहा,नाश्त्याची व्यवस्था करीत असतात. ते स्वतः हा नाश्ता भाविकांपर्यंत पोहचवत असताना कथा मंडपातच अन्नाची रिकामी पाकीटे पडून राहतात. अस्वच्छता राहू नये, यासाठी ज्यांना भाविकांसाठी काही द्यायचे असेल, त्यांनी या स्टॉल्सवरच द्यावे, एमआयडीसीमध्ये पार्कींगची व्यवस्था केली आहे. चेंगराचेंगरी सारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी 8 एक्झीट गेट ठेवण्यात आले आहे. 27 स्क्रीन मंडपात लावण्यात येतील. शंभरपैकी 2 स्टॉल्स हे आरोग्य सेवेचे असतील. ज्यांना अन्नदान करायचे असतील त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अनुप अग्रवाल यांनी केले.

या पत्रकार परिषदेला खा.डॉ.सुभाष भामरे यांनी शिवमहापुराण कथेसाठी 50 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. याआधी अनुप अग्रवाल, चेतन मंडोरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेला खा.डॉ.सुभाष भामरे, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिंदे गटाचे मनोज मोरे, सतीश महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, बाळासाहेब भदाणे, चेतन मंडोरे, मायादेवी परदेशी, शितलकुमार नवले आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी appeared first on पुढारी.