नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरेतील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमधील गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती तसेच नदीघाट सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने साकारण्यात येणाऱ्या २७८० कोटींच्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची १२ सदस्यीय समिती गठीत केली आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीमार्फत सादर केल्या जाणाऱ्या सर्वेक्षण अहवालासह विविध कागदपत्रांची छाननी करून मंजुरीसाठी सादर करण्याची जबाबदारी या समितीची असणार आहे. (Nashik Namami Goda)
नाशिकला २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कंभुमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशकात ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मे. अलमण्डस् ग्लोबल सिक्युरिटीज् लिमिटेड या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. सदर सल्लागार संस्थेने या प्रकल्पासाठी प्रारूप आराखडा सादर केला आहे. उपयोगिता अहवालदेखील सादर करण्यात आला आहे. निविदा अटी-शर्तींनुसार सल्लागारामार्फत सादर करण्यात येणाऱ्या विविध अहवालांच्या छाननीसाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार आयुक्त डॉ. करंजकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. (Nashik Namami Goda)
अशी आहे अधिकाऱ्यांची समिती (Nashik Namami Goda)
शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा व मलनिस्सारण) संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) अविनाश धनाईत हे सह अध्यक्ष असून, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, सचिन जाधव, गणेश मैड, राजेंद्र शिंदे, रवींद्र धारणकर, प्रकाश निकम, नितीन पाटील, बाजीराव माळी समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
समितीची जबाबदारी
सल्लागारामार्फत सादर करण्यात येणारे विविध अहवाल व त्यासंदर्भातील कागदपत्रांची छाननी करण्याची तसेच सदर अहवाल, प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर सादर करण्याची जबाबदारी या समितीची असणार आहे.
हेही वाचा :
- ASER report : विद्यार्थ्यांना अक्षरे कळेनात आणि अंक उमजेनात! वाचा ‘असर’चा अहवाल
- कोल्हापूर : पोलिस कर्मचारी गप्पांत दंग, कैद्यांचा मुक्त संचार!
- बडोदा : पिकनिकला आलेल्या मुलांची बोट बुडून 16 जणांचा मृत्यू
The post 'नमामि गोदा'साठी बारा अधिकाऱ्यांची समिती appeared first on पुढारी.