नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

फेक बनावट साहित्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महात्मा गांधी रोडवरील मोबाइल विक्रेते नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करीत ३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला. विक्रेत्यांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधी रोडवरील प्रधान पार्क परिसरात असलेल्या गाळ्यांमध्ये मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. यापैकी काही दुकानांमध्ये बनावट मोबाइल साहित्य विक्री होत असल्याची माहिती विशेष पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. १३) या ठिकाणी छापा टाकला. त्यात रूपाराम चौधरी (४०), बाबूलाल चौधरी (२८), दिलीप बिष्णाई (२६), कमलेशकुमार चौधरी (२३, सर्व रा. पंचवटी) यांच्या दुकानांची तपासणी केली. चौघांच्या दुकानात नामांकित कंपनीच्या नावे असलेले बनावट मोबाइल साहित्य आढळले. त्यामध्ये मोबाइल कव्हर, ब्ल्यूटूथ, चार्जरसह इतर मोबाइल साहित्यांचा समावेश आहे.

याआधीही बनावट मोबाइल साहित्य विक्रीप्रकरणी कारवाई झाली आहे. मात्र तरीदेखील विक्रेत्यांकडून सर्रास बनावट साहित्य विक्री होत असल्याने विक्रेत्यांना कारवाईचा धाक नसल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे तेथील व्यावसायिकांमधील अंतर्गत कलह कायम वादाचा मुद्दा असल्याने व स्थानिक आणि परप्रांतीय वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार गणेश भामरे, भारत डंबाळे, अविनाश फुलपगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा –

The post नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.