नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पावसाळा तोंडावर आलेला असताना महापालिकेची नालेसफाईची कामे अद्यापही कागदावरच आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसाने ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल करणारी ठरली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नाशिकची पुन्हा ‘तुंबापुरी’ तर होणार नाही ना, असा सवाल आता शहरवासीयांकडून केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात महापालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामांतर्गत नालेसफाई, विशेषत: नैसर्गिक नाल्यांची सफाई केली जाते. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटारे तसेच भूमिगत गटारांची साफसफाई करून चेंबरची दुरुस्ती केली जाते. पाऊस पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. यंदाही महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गेल्या आठवड्यात पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्जतेचे आदेश दिले. त्यानुसार या कामांना गती येणे आवश्यक होते. मात्र गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी साचलीच. चेंबरमध्ये कचरा, प्लास्टिक पिशव्यांचा कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी आलेल्या अडचणी, नैसर्गिक नाल्यांमध्ये ‘जैसे थे’ असलेली माती, कचऱ्याचे ढीग, नदी, नाल्यांच्या प्रवाहात अडथळा ठरणारा प्लास्टिकचा कचरा, वाढलेली झाडे, झुडपे लक्षात घेता, पावसाळीपूर्व कामांचे आयुक्तांचे आदेश डावलण्यात आल्याचे दिसत आहे.
शहरात सुमारे ४५० किलोमीटर लांबीच्या भूमिगत गटारी आहेत. या गटारींवर सुमारे साडेसात हजार चेंबर्स आहेत. सुमारे ४०० मॅनहोल आहेत. या गटारी, चेंबर्सची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबून सखल भागात नागरिकांच्या घरात शिरण्याचा व त्यामुळे वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यासाठी महापालिकेने पावसाळापूर्व कामांना तातडीने चालना देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण ‘जैसे थे’
शहर, परिसरात जवळपास ६५ नैसर्गिक नाले आहेत. अनेक ठिकाणी हे नैसर्गिक नाले बुजवले गेले आहेत. नैसर्गिक नाले बुजवून त्यावर पक्की बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते. त्यामुळे नैसर्गिक नाले प्रवाहित होण्यासाठी त्यावरील अतिक्रमणे हटविणेदेखील गरजे आहे. मात्र, त्याकडे महापालिकेची यंत्रणा डोळेझाक करीत आहे.
ही पावसाळापूर्व कामे शिल्लक
* शहरात एकूण ४५० किमी लांबीच्या भूमिगत गटारे
* गटारींवर सुमारे ७५०० चेंबर्स, ४०० मॅनहोल्स
* शहरात एकूण ६५ नैसर्गिक नाले
हेही वाचा –