नाशिकमधून अखेर गोडसे-वाजे लढत

मिलिंद सजगुरे, नाशिक

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यभर सातत्याने चर्चेत राहिलेल्या नाशिक मतदार संघातील महायुती उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ते सलग तिसर्‍यांदा मतदारांचा कौल आजमावणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत गोडसे यांची प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडून भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, भाजपचे आमदार राहुल ढिकले आदी नावांची उमेदवार म्हणून चर्चा होती. शिवाय अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले महंत शांतिगिरी महाराज यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितल्याने तिढा निर्माण झाला होता. अगदी मंगळवारपर्यंत इथली उमेदवारी अनिश्चिततेच्या फेर्‍यात होती. तथापि, मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये येऊन बैठकांचे सोपस्कार पार पडल्यानंतर महायुतीतील हालचाली गतिमान झाल्या. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असल्याने आज कोणत्याही परिस्थितीत महायुतीची उमेदवारी जाहीर होणे अपेक्षित होते. त्यानुसार, शिवसेना शिंदे गटाकडून गोडसे यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

गोडसे यांच्या उमेदवारीला स्वपक्षासह भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाही विरोध असल्याचे बोलले जात होते. याच कारणामुळे त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेला विलंब झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या जागेप्रमाणे नाशिक प्रतिष्ठेचे केल्याने अखेर भाजपला एक पाऊल मागे यावे लागले. शिवसेना शिंदे गटाचा विचार करता ‘इलेक्टिव मेरिट’ असलेला उमेदवार म्हणून केवळ गोडसे यांच्याकडेच पहिले जात असल्याने सहयोगी पक्षांच्या विरोधानंतरदेखील त्यांना उमेदवारी देण्याची अपरिहार्यता पक्षाला स्वीकारावी लागली. गोडसे विजयाची हॅट्ट्रिक साधतात की महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे त्यांचा विजयी वारू रोखतात, याकडे उभ्या मतदार संघाचे लक्ष लागून राहणार आहे.

सलग दोनदा चढ्या विजयांची नोंद

2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर उमेदवारी केलेल्या हेमंत गोडसे यांना पराभूत व्हावे लागले असले, तरी त्यांना सुमारे सव्वादोन लाख मते प्राप्त झाली होती. त्यांनतर त्यांनी एकसंघ शिवसेनेत प्रवेश करून 2014 ची सार्वत्रिक निवडणूक नाशिक मतदार संघातून लढवली. गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहुबली उमेदवार छगन भुजबळ यांचा 1.87 लाख मतांनी दारुण पराभव करीत ‘जायंट किलर‘म्हणून स्वतःला चर्चेत आणले होते. 2019 मध्ये भुजबळ यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले. ही निवडणूक गोडसे यांनी तब्बल 2.92 लाख मतांनी जिंकल्याने ते राज्यभर चर्चेत आले होते. यावेळी मतदार त्यांना कसे स्वीकारतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.