नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टरही फाडले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरी जनतेची माफी मागितली आहे. मात्र त्यानंतरही आव्हाड यांच्याविरोधात सत्तारूढ भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाले असून, बुधवारी(दि.२९) नाशिकमध्ये शिंदे गटाच्या युवासेनेने आव्हाड यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध नोंदविला.
राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरातून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या ठिकाणी जात मनुस्मृती दहन करत निषेध नोंदवला. यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडले गेले, यामुळे राज्यभरातून आव्हाडांवर टीका होत आहे. नाशिकमध्ये मायको सर्कल येथील शिवसेना(शिंदे गट) मध्यवर्ती कार्यालयासमोर युवासेनेने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीच आव्हाड यांनी हे आंदोलन केल्याचा आरोप करत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना विस्तारक योगेश बेलदार, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, भाविसे महानगरप्रमुख शुभम पाटील, झोपडपट्टी महासंघाचे जिल्हाप्रमुख भिवानंद काळे, महानगर प्रमुख सनी रोकडे, मिलिंद मोरे, ओमकार चव्हाण, श्रावण पवार, सनी पगार, सुनील परदेशी, आदी उपस्थित होते.
हेही वाचा –