नाशिकमध्ये महिनाभरात हजारांवर वाहनं ‘टोइंग’

नाशिक टोईंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांतर्फे पुन्हा टोइंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महिनाभरात एक हजार ३३ वाहनांवर टोइंग कारवाई होऊन सुमारे सात लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, टोइंग वाहनचालकांकडून नियमांची पूर्तता होत असल्याने वाहनचालक आणि टोइंग चालकांमध्ये वादविवादाचे प्रसंग कमी झाल्याचे चित्र आहे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. नियमित उद‌्भवणारी ही समस्या निकाली काढण्यासाठी शहर पोलिसांनी १ मेपासून पुन्हा टोइंग कारवाई सुरू केली आहे. त्यात एम. जी. रोड, सिटी सेंटर मॉल, कॉलेज रोड, शरणपूर रोड यासह इतर प्रमुख रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. ज्या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक आहेत त्या ठिकाणीच कारवाई करण्याची सूचना टोइंग व्हॅनचालकांना देण्यात आली आहे. यापूर्वी टोइंग व्हॅनवरील कर्मचारी उद्धट वर्तन, अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे टोइंग कंत्राटाला मुदतवाढ देताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधितांना समज देत कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी नियमित कारवाईचा आढावा घेत आहेत. त्यानुसार टोइंग व्हॅनवरील कर्मचारी कारवाई करण्याआधी पूर्वकल्पना देत आहेत, तसेच वाहनचालकांशी हुज्जत टाळतात. त्यामुळे टोइंग व्हॅनवरील कर्मचारी व वाहनचालकांमधील वादाचे प्रसंग कमी झाल्याचे बोलले जात आहे. कारवाई झालेली वाहने शरणपूर रोडवरील कार्यालयात जमा होतात. तिथे वाहनचालकास दंडासंदर्भात माहिती दिली जाते. दरम्यान, शहरात वाहनतळांची संख्या अपुरी असून, अनेक ठिकाणी रस्त्यांलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. त्यानुसार वाहतूक विभागाने महापालिकेला वाहनतळांचे फलक लावण्याची सूचना केली आहे.

टोइंगऐवजी ई चलन

शहरात दुचाकीचालकांना ५९०, तर चारचाकी चालकांना ८५० रुपयांचा दंड आहे. त्यातील ५०० रुपये हा बेशिस्तपणे वाहन उभे केल्याप्रकरणी शासकीय दंड आहे. तसेच काही ठिकाणी आवश्यकतेनुसार टोइंगऐवजी ‘ई-चलन’ कारवाई केली जात आहे. निवडणुकीमुळे १८ ते २१ मे दरम्यान टोइंग कारवाई बंद करण्यात आली होती.

टोइंग कारवाई…

  • दुचाकी – ८८१ : दंड – ४ लाख ४५ हजार रुपये
  • कार – ४५२ : दंड – २ लाख २६ हजार रुपये

पूर्वसूचना दिल्याशिवाय टोइंग न करण्याचे आदेश टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सध्या कारवाई सुरू आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी ई-सुविधाही उपलब्ध आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत. तक्रारी असल्यास आयुक्तालयाच्या व्हॉटसॲप हेल्पलाइनवर नोंदवाव्यात.

– दिवाणसिंग वसावे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक

हेही वाचा –