नाशिकमध्ये रंगणार लेखक, प्रकाशकांचे साहित्य संमेलन

साहित्य संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित लेखक-प्रकाशकांच्या चौथ्या साहित्य संमेलनाचे शनिवार दि. ६ व ७ मे रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष अशोक कोठावळे, स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर आहेत. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे, उपाध्यक्ष वसंत खैरनार, कार्यवाह सुभाष सबनिस, प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

६ मे रोजी नायगावकर यांची मुलाखत

सकाळी ९ ते १० दरम्यान संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री छगन भुजबळ, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रतिष्ठानचे सल्लागार हेमंत टकले उपस्थित असणार आहेत. प्रसंगी अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा सत्कार आणि गरुडझेप स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. १२ ते १ दरम्यान ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे घेणार आहेत. ३ ते ४ वाजता ‘प्रकाशन व्यवसायापुढील आव्हाने’ विषयावर परिसंवाद, ४ ते ५ वाजता ‘कुसुमाग्रज ते तात्यासाहेब – साहित्यिक ते समाजसेवक’ विषयावर परिसंवाद, ५.३० ते ६.३० वाजता ‘काळानुसार दिवाळी अंक बदलतो आहे!’ या विषयावर परिसंवाद होणार आहेत. ६.३० ते ८ वाजता प्रथम कविसंमेलन, तर ८ ते ९ द्वितीय कविसंमेलन रंगणार आहे.

७ मे रोजी ॲड. निकम यांची मुलाखत

१० ते ११.३० वाजता पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्काराने, तर ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे यांना साहित्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. १२ ते १ वाजता स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. ३ ते ४ वाजता ‘जनस्थानातील साहित्य परंपरा’ या विषयावर चर्चासत्र तसेच ४.३० ते ६ वाजता संमेलनाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये रंगणार लेखक, प्रकाशकांचे साहित्य संमेलन appeared first on पुढारी.