
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शांतीगिरी महाराजांनी सोमवार (दि. २९) शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेकडून आपण अर्ज दाखल केल्याचे सांगितले. महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी महाराजांनी शिंदे गटाच्या सेनेचे नाव घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराबाबत तिनही पक्षांचे श्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगितले.
जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी सोमवार (दि. २९) रोजी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यासोबतच अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहणारे शांतिगीरी महाराज यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना आपण शिंदे गटाकडून अर्ज भरल्याचे सांगितले. मात्र, अद्याप एबी फॉर्म मिळाला नसल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. याबाबत मंत्री भुजबळांना विचारणा केल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले.
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराज यांनी रविवारी (दि.२८) भुजबळ फार्म येथे जाऊन भुजबळांसोबत बंद दाराआड संवाद साधला होता. आधीच या जागेबाबत महायुतीचा तिढा कायम आहे. छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असे संकेत मिळाले होते. मात्र, नंतर त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेस विलंब झाल्याने त्यांनी माघार घेतली त्यानंतरही तिढा सुटलेला नाही तर दुसरीकडे शांतिगीरी महाराज यांनी उमेदवारी दाखल करताना शिंदे गटाचे नाव घेतले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत अद्यापही सस्पेन्स कायमच आहे.
हेही वाचा –