नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता

मनरेगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 1 हजार 523 कामे सुरू आहेत. या कामांवर 8 हजार 196 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात मजुरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

ऐन फेब्रुवारीत जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा 33 ते 35 अंशांदरम्यान पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. त्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांची पावले मनरेगा कामांकडे वळत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून दीड हजारांवर कामे सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायती अंतर्गत सर्वाधिक एक हजार 14 कामे केली जात आहेत. तर यंत्रणांच्या पातळीवरील कामांची संख्या 509 इतकी आहे. या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात मनरेगा योजनेत सर्वाधिक घरकुलांचे कामे केली जात असून, त्याची संख्या 539 इतकी आहे. त्याखालोखाल 417 फळबागा लागवडीची कामे देण्यात आली आहेत. 239 ठिकाणी वृक्षलागवड, 124 ठिकाणी कॅटल शेड, 94 विहिरी, 15 ठिकाणी वॉल कम्पाउंड, 14 गोटशेडची कामे हाती घेण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त 43 ठिकाणी रस्ते उभारणी केली जात आहे. रोपवाटिका, गाळ काढणे, शौचालये, मातीनाला बांध, स्मशानभूमी आदी कामेही मजुरांमार्फत करण्यात येत आहेत. उन्हाचा कडाका बघता पुढील 3 महिन्यांत अधिकाधिक मजूर कामांची मागणी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने कामांच्या नियोजनावर भर दिला आहे.

मनुष्यबळ निर्मितीची उद्दिष्टपूर्ती
शासनाने जिल्ह्याला चालू वर्षी कुशल आणि अकुशल मजुरांबाबत 18 लाख 52 हजार 320 मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. प्रशासनाने आतापर्यंत 24 लाख 18 हजार 973 मनुष्यबळ निर्मिती करत 130.6 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मजुरांना त्यांच्या रोजगारापोटी 87 कोटी 9 लाख 27 हजार रुपयांचे अनुदान वितरित केले. 31 मार्चसाठी अद्यापही 39 दिवस बाकी असल्याने या आकडेवारीत निश्चित वाढ होणार आहे.

The post नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता appeared first on पुढारी.