नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिक जिल्हा परिषद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याच्या विकासाचे मुुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषद अर्थातच मिनी मंत्रालयात पिण्याच्या पाण्याची वानवा बघायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा परिषदेतच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या नागरिकांचे तसेच ठेकेदार, अभ्यागतांचे हाल होत आहेत.

जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी वगळता दररोज साधारण पाचशे ते सहाशे सर्वसामान्य नागरिकांचा काही ना काही कामानिमित्त राबता असतो. येथे आल्यानंतर नागरिक जिल्हा परिषदेच्या आवारात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याकारणाने तहानेने व्याकूळ होत आहेत. याबाबत प्रशासनाकडे मागणी केली असता बघतो, करतो, अशी प्रशासनाची भूमिका असल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार की, असाच रेंगाळत राहणार आहे. सध्या नाशिकमध्ये तापमानाचा पारा सतत ३७ ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत आहे. गेल्याच महिन्यात उष्माघाताने अनेकांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष उभारला आहे. उष्माघाताबाबत एवढी काळजी घेतली जात असली तरी जिल्हा परिषदेच्या आवारात एकही पाण्याची टाकी, जलकुंभ किंवा फिल्टर अशी काहीच व्यवस्था नाही. याबाबत जिल्हा परिषद प्रशासन काही कार्यवाही करणार की, आहे त्याच परिस्थितीत उन्हाळा घालवणार याकडे लक्ष लागले आहे.

पदाधिकाऱ्यांच्या केबिनसह फिल्टरही बंद दाराआड
जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप लावण्यात आले आहे. या ठिकाणी असलेले फिल्टरदेखील त्यामुळे बंद दाराआड गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फिल्टरचा तरी वापर करण्यात यावा, अशी चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : काय म्हणता.... जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही appeared first on पुढारी.