नाशिक: कावनई किल्ल्यावरून दरड कोसळली

Kawanai fort

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील इतिहास कालीन व पूर्वी कुंभमेळ्याचे उगमस्थान असणाऱ्या कावनई येथील १४ व्या शतकातील शिवकालीन किल्ल्यावरून दगडी दरड खाली कोसळली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी गावकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन तहसीलदार अभिजीत बारावकर केले आहे.
समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंच असलेला कावनई किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तालुका म्हणून प्रसिद्ध होता. भारतात मोजकेच कामाक्षी माता मंदिर असलेल्या स्थळापैकी कामाक्षी मातेचे मंदिर कावनई गावात आहे.

किल्ल्याच्या खालच्या भागात चार पाच कुटुंबाची छोटेखानी घरे असून दैव बलवत्तर म्हणून त्यांच्यापर्यंत दरड आली नाही. सध्या दरड कोसळण्याची स्थिती स्थिर आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळवण्यात आले आहे. बिटुर्ली शिवारात असलेल्या या किल्ल्याजवळील घटनास्थळी तहसीलदार अभिजीत बारावकर, ग्रामसेवक ज्योती केदारे यांनी पाहणी केली. परिसरातील गावांना कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले. तहसीलदार यांच्यासह पोलीस अधीक्षक सुनील भामरे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पवार, आदीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दरड पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: कावनई किल्ल्यावरून दरड कोसळली appeared first on पुढारी.