नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा

वनराई बंधारा www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या कुसमाडी वनबंधार्‍याचा गाळ काढण्याचा व दुरुस्तीचा या उन्हाळ्यातला टप्पा पूर्ण झाला असून, त्यानिमित्त येत्या 27 मे रोजी कुसमाडी वनबंधारा स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मोती-गारदा नदीसंवर्धन प्रकल्पाच्या वतीने अंकाई किल्ल्यासमोरील सुळेश्वर डोंगरात उगम पावणार्‍या मोती नदीच्या संपूर्ण पाणलोट विकासाचा संकल्प करण्यात आला आहे. 71 किलोमीटर वाहणारी गोदावरीची ही उपनदी आजवर तशी दुर्लक्षित राहिली होती. येवल्यातला हा सातमाळा डोंगररांगेचा परिसर पूर्वी भरपूर वनराई व दाट झाडीचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. कालांतराने तो उजाड झाला आणि त्यासोबतच इथले पर्जन्यमान तथा भूजलपातळीत कमालीची घट झाली. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले तसेच पीकही दुरापास्त झाले. गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचे संकट गडद होत असताना परिसरातील जनता पाण्यावाचून बेहाल झाली होती, त्यामुळे इथले जीवनमान मंदावले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने महाराष्ट्रातील 75 नद्या अमृतवाहिनी बनविण्यासाठी सुरू केलेल्या ‘चला जाणूया नदीला’ अभियानात येवला तालुक्यातील मोती नदीचा समावेश केला. या अभियानाला चालना देण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा होता. ही गरज ओळखून शासनाने नियुक्त केलेले नदी प्रहरी मनोज साठे व प्रशांत परदेशी यांनी पाण्याच्या कामाविषयी तळमळ असलेल्या मित्रपरिवारास गोळा करून संपूर्ण नदीच्या पाणलोटात विकासाची गंगा आणण्याचा संकल्प केला. यासाठी मुंबईच्या मराठमोळ्या इनोव्हेशन्स संस्थेची मदत घेण्यात आली. राज्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली. दानशुरांकडून डिझेल, ट्रॅक्टर सेवा, जेसीबी, पोकलेन सेवा मिळविण्यात आली. सव्वा महिना बंधार्‍यातून गाळ काढण्याचे काम सुरू होते. 72 च्या दुष्काळाच्या वेळी करण्यात आलेली बंधार्‍याची दगड-मातीची भिंत गळती होत असल्याने पाणी धरत नव्हती. त्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम घेण्यात आले. दरम्यान, डॉ. सिंगल यांच्यासह कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण चंदाताई तिवाडी यांचे नदीवरचे भारूड सादर होणार आहे.

जलयोद्ध्यांना उपस्थितीचे आवाहन
येथील कामाची प्रेरणा घेऊन इतर गावांमध्ये या स्वरूपाचे जलसंवर्धनाचे काम सुरू करण्याचा तथा ग्रामीण रोजगारनिर्मितीचा मानस असून, जलयोद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन मोती गारदा नदीसंवर्धन प्रकल्प तथा चला जाणूया नदीला अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कुसमाडी वनबंधार्‍याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा appeared first on पुढारी.