नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा

गणवेश व पुस्तकांची सक्ती,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुढील जून महिन्यांपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार असून, पालकांकडून आपल्या पाल्याच्या प्रवेशापासून ते शालेय साहित्य खरेदीची लगबग बघावयास मिळत आहे. त्यात खासगी शाळांकडून दरवर्षीच पालकांना विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य तसेच गणवेशाच्या खरेदीची सक्ती केली जात असल्याने, मनपा शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या या मनमानी धोरणाला चाप बसविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे एक पत्र जारी करून विशिष्ट ठिकाणीच खरेदी करा, अशी सक्ती करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई केली जाणार आहे. एखाद्या शाळेबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित शाळा प्रशासनावर कठोर कारवाईचे संकेत मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टया ३१ मे ला संपणार असून, सन २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल. शहरात मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण शंभर शाळा आहेत. तर खासगी शाळांची संख्या दोनशेच्या घरात आहे. मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश दिले जातात. पण याबाबत खासगी शाळा प्रशासनाकडून मनमानी कारभार सर्वश्रुत आहे. पालक व विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज, दप्तर आदी शालेय साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याच्या सूचना दिल्या जातात. अनेकदा अशी दुकाने महागडी असतात. पण, शालेय प्रशासनाच्या सक्तीमुळे जादा दराने नाईलाजाने या वस्तू खरेदी करण्याची वेळ पालकांवर येते. विद्यार्थ्यांचे नुकसान अथवा त्यास त्रास नको म्हणून पालक मुकाट्याने खरेदी करतात. हल्ली खासगी शाळांमध्ये असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. ते पाहता शिक्षण विभागाने सर्व खासगी शाळांना पत्रक काढून शालेय साहित्य खरेदीची कोणत्याही प्रकारची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असे पत्र काढत ताकीद दिली आहे.

काय म्हटले पत्रात

– पालक शिक्षक संघाने निश्चित केलेले शुल्क आकारावे

– प्रवेश देताना देणगी आकारू नये

– पुनर्प्रवेश शुल्क घेऊ नये

– शैक्षणिक शुल्क प्रतिमाह घ्यावे. एकाचवेळी भरण्यासाठी तगादा लावू नये

– वार्षिक निकाल, दाखला अडवू नये

खासगी शाळांसाठी पत्रक काढले असून, शालेय साहित्य खरेदी व इतर बाबींबाबत कोणतीही सक्ती खपवून घेतली जाणार नाही. याबाबत तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल.

– सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, मनपा

हेही वाचा : 

The post नाशिक : गणवेश, पुस्तकांची सक्ती कराल तर याद राखा! मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी शाळांना इशारा appeared first on पुढारी.