नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा नाशिक,www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर

जिल्ह्याला निसर्गाचे मोठे काेंदण लाभलेले आहे. पावसाचे माहेरघर म्हणून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरची राज्यभरात ओळख आहे. वर्षाविराहाला येणाऱ्या पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा दुगारवाडी धबधबा. हा धबधबा गर्द हिरवाईतून अतिशय उंच डोंगरावरून कोसळतो. त्यातून अंगावर पडणारे असंख्य तुषार पर्यटकांना मोहिनी घालतात. मात्र, दुगारवाडी धबधब्याचा परिसर धोकादायक असल्याने पर्यटकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील सापगावपासून दुगारवाडी धबधब्याकडे जाता येते. सापगावमधून पुढे काचुर्ली रस्त्याला लागतो. पूर्वी काचुर्ली गावातून दुगारवडी धबधब्याकडे पायी जावे लागे, आता वनविभागाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहने नेता येतात. त्यानंतर पायी डोंगर-दऱ्यातून वाट काढत जाताना नदी ओलांडल्यानंतर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या धबधब्यापर्यंत पोहोचतो. डोंगरमाथ्यावर बरसणाऱ्या वरुणराजावर नदीचा प्रवाह अवलंबून असल्याने धबधब्यापर्यंत नदी ओलांडून जाताना व पुन्हा माघारी फिरताना विशेष खबरदारी घ्यावी लागते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी, पहिणेबारी, आंबोली, मेटघर आदी गावे पावसाळ्यात बघण्यासारखी असतात. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाईने नटलेला परिसर आणि अधूनमधून सातत्याने होणारा पाऊस व अंगाला झोंबणारा गारवा असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना भुरळ घालते. नाशिक शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर हा परिसर असल्याने पर्यटकांसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. पहिणे येथील नेकलेस वॉटरफॉल बघण्यासाठी वीकेण्डला पर्यटक सहपरिवार गर्दी करतात.

धबधब्यापर्यंत कसे जाणार?

त्र्यंबकेश्वरपासून जव्हार रस्त्यावर २ किमी अंतरावर सापगाव आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर एसटी महामंडळासह सिटीलिंकच्या बसेस ठराविक वेळेने धावतात. जव्हारकडे जाणाऱ्या बसेसदेखील सापगावला थांबतात. नाशिकमधून खासगी वाहतुकीची वाहनेही उपलब्ध आहेत. सापगावपासून थेट दुगारवाडी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अडीच तास लागतात.

हेही वाचा :

The post नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा appeared first on पुढारी.