नाशिक : चांदवडला हिंदू जनआक्रोश मोर्चात लोटला जनसागर 

हिंदू जनआक्रोश मोर्चा,www.pudhari.news

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा

हाती भगवा झेंडा, डोक्यात भगवी टोपी, अंगात भगवे वस्त्र अन‌् मुखी सियावर रामचंद्र की जय, वंदे मातरम, भारत माता की, जयचा नारा देत लहान, मुले, मुली, तरुण, तरुणी, महिला पुरुष हजारोंच्या संख्येने हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले. यावेळी हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायावर त्वरित कायदे करून त्यांची त्वरित अंमलबजावणीच्या मागणीचे निवेदन लहान मुलींच्या हस्ते चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस अधिकारी सविता गर्जे यांना देण्यात आले.

चांदवड तालुका सकल हिंदू समाज बाधवांच्या वतीने रविवार (दि.३) हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी शहर व तालुक्यातील हिंदू बांधवांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जमण्यास सुरुवात केली. अकराच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा बाजार समिती, मुंबई आग्रा महामार्ग सर्व्हिस रोड, चिंचबान, चांदवड नगरपरिषद, श्रीरामरोड, छत्रपती शिवाजी महाराज राजे चौक, सोमवार पेठ, आठवडे बाजार, गणूर चौफुलीमार्गे पुन्हा बाजार समितीत पोहचला. यावेळी बाजार समितीत जाहीर सभा झाली. सभेत आळंदीचे हभप संग्रामबापू भंडारे, संभाजीनगरच्या हर्षा ठाकूर, भिवंडी येथील हभप एकनाथ महाराज सदगीर यांनी सकल हिंदू समाज बांधवाना संबोधीत केले. व्यासपीठावर श्री चंद्रेश्वर मंदिराचे महंत जयदेवपुरीजी महाराज उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद चांदवडला होणाऱ्या हिंदू जन आक्रोश मोर्चावर होऊ नये, यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मोठी दक्षता घेत मोर्चाचे नियोजन केले. मोर्चा दरम्यान मनमाडचे पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख, चांदवड प्रभारी पोलीस अधिकारी सविता गर्जे, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, रविंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात होते.

आमदार राणे, आ .आहेर मोर्चात सहभागी

मोर्चात भाजपाचे आमदार नितेश राणे, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर सहभागी झाले होते. हे दोघेही व्यासपीठावर न बसता मोर्चेकऱ्यांमध्ये उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. शहरातील सर्व दुकानदार, व्यापारी, हॉटेलधारकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवीत पाठिंबा दिला. मोर्चादरम्यान शहरातील फक्त अत्यावश्यक सेवा सुविधा सुरळीत सुरु होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फुलांचे पुष्हापर अर्पण करण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : चांदवडला हिंदू जनआक्रोश मोर्चात लोटला जनसागर  appeared first on पुढारी.