नाशिक : सुनील वाघ खून प्रकरणात कुंदन परदेशीला जन्मठेप

न्यायालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील हनुमानवाडी कॉर्नरवर भेळविक्रेता सुनील वाघ याचा निर्घून खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा सराईत गुन्हेगारांना सात वर्षे आणि मारहाण केल्याप्रकरणी इतरांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

या गुन्ह्यातील इतर १० संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले असून, त्यात तीन विधीसंघर्षित मुलांचाही सहभाग आहे. दरम्यान, न्यायालयाने सरकारी पंचांसह १५ फितूर साक्षीदारांविरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. हनुमानवाडी कॉर्नरवर सुनील रामदास वाघ, हेमंत रामदास वाघ या भावंडांचा भेळव्रिकीचा गाडा होता. २७ मे २०१६ रोजी रात्री ८ च्या सुमारास जुन्या भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने वाघ बंधूंवर सशस्त्र हल्ला केला होता. यात सुनील वाघ यांचा मृत्यू तर हेमंत वाघ गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात कुंदन परदेशी याच्यासह टोळीतील २१ जणांविरोधात खून, प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार परदेशी टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र, तो आरोप सिद्ध न झाल्याने मोक्का रद्द केला होता.

दरम्यान, गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ए. एम. मेश्राम, उपनिरीक्षक व्ही. एस. झोनवाल, आर. एस. नरोटे, बी. बी. पालकर यांनी केला होता. या गुन्ह्यातील सर्व संशयितांना पोलिसांनी पकडून न्यायालयात टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश बी. व्ही. वाघ यांनी मुख्य आरोपी कुंदन सुरेश परदेशी यास जन्मठेप आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. तर, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी राकेश तुकाराम कोष्टी, जयेश ऊर्फ जया हिरामण दिवे, व्यंकटेश ऊर्फ व्यंक्या नानासाहेब मोरे, किरण दिनेश नागरे, अक्षय कैलास इंगळे, रवींद्र दगडूसिंग परदेशी यांना प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. तर मारहाण प्रकरणी गणेश भास्कर कालेकर याच्यासह अक्षय इंगळे व रवींद्र परदेशी यांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार एम. एम. पिंगळे, गणेश निंबाळकर, एस. एन. जगताप, के. पी. महाले, तनजीम ई. खान यांनी कामकाज पाहिले.

आईसह भावाची साक्ष महत्त्वाची

सुनील वाघ खून खटल्यात भाऊ हेमंत वाघ व आई मंदा वाघ हे गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायालयात त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याचप्रमाणे, मृत सुनील वाघ यांच्या रक्ताचे डाग मुख्य आरोपी कुंदन परदेशी याच्या अंगावरील कपड्यांवर मिळून आले होते. सात वर्षे शिक्षा ठोठावलेल्यांमध्ये भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे, पदाधिकारी राकेश कोष्टी यांचाही समावेश आहे.

फितुरांवर कारवाईचे आदेश

वाघ खून खटल्यात ३४ साक्षीदार तपासले. परंतु यातील दोन सरकारी पंचांसह १८ साक्षीदार फितूर झाले. त्याचा फायदा गुन्ह्यातील इतर संशयितांना मिळाला. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत फितूर १८ साक्षीदारांना नोटिसा बजावल्या व चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईमध्ये साक्षीदार फितूर झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना किमान सात वर्षे कारावासाची शिक्षा आहे. विशेषत: फितूर साक्षीदारांमध्ये दोन सरकारी पंच असून, ते महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आहेत.

बागूलसह १० निर्दोष

श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागूलविरोधातही वाघ यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी बागूल याच्यासह १० जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

न्यायालयात चोख बंदोबस्त

या खटल्याचा निकाल लागणार असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून न्यायालय परिसरात सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी आरोपींसह संशयितांच्या नातलग, समर्थकांनीही न्यायालयात गर्दी केली होती. मात्र, बंदोबस्ताचे नियोजन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

न्यायालयाचा निकाल समाधानकारक आहे. त्याचप्रमाणे फितूर झालेल्या १८ साक्षीदारांनाही न्यायालयाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे भविष्यात फितूर होणाऱ्यांवर वचक राहील. मृत सुनील यांची आई व भावाने दिलेल्या साक्षीमुळे आरोपींना शिक्षा लागण्यास मदत मिळाली.

– ॲड. पंकज चंद्रकोर, विशेष सरकारी वकील

हेही वाचा : 

The post नाशिक : सुनील वाघ खून प्रकरणात कुंदन परदेशीला जन्मठेप appeared first on पुढारी.