नाशिक : चाळीत लावलेला शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला

देवळा : तालुक्यातील भऊर येथील शेतकऱ्याच्या घराजवळील कांदा चाळीत लावलेल्या ट्रॅक्टरची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना नुकतीच घडली असून, ट्रॅक्टर सारख्या इतक्या मोठा वस्तूची चोरी झाल्याने वाहन धारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत देवळा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

भऊर येथील शेतकरी सुरेश आप्पाजी पवार हे कळवण रोड, श्रीराम नगर येथे आपल्या कुटुंबियांसह राहतात. दि. २ नोव्हेंबरच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पवार यांचा मुलगा मयूर हा आपल्या स्वराज कंपनीच्या निळ्या रंगाचा (७३५ एक्स टी मॉडेल, क्र. एम.एच. ४१ बी.ई. ०६३७) ट्रॅक्टर ला रोटावेटर जोडून घरालगत असलेल्या चाळीत ट्रॅक्टर उभा करून घरात गेला. यानंतर घरातील सर्व मंडळी जेवण करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आढळून आला नाही. त्यांनी आजूबाजूच्या ठिकाणी पाहिले, शेजारील शेतकऱ्यांना संपर्क साधून तपास केला असता काहीच माहिती मिळाली नाही. यामुळे सदर ट्रॅक्टरची चोरी झाल्याची खात्री झाल्यावर मयूर सुरेश पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.  देवळा पोलिसांत अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस करीत आहेत.

The post नाशिक : चाळीत लावलेला शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला appeared first on पुढारी.