नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम

जिल्हा बँक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचारीवर्गाने जूनपर्यंत एकही सुटी न घेता काम करून बँकेसाठी एकच ध्यास घेत बँकेच्या ठेववाढ, वसुली, बँकेच्या भागवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा निर्णय ‘बँक बचाव’ मेळाव्यात घेतला. तसेच बँकेचे नवीन वैयक्तिक सभासद करून घेण्याचाही निर्णय घेतला आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को- ऑप. बँक एम्प्लॉइज युनियनकडून शुक्रवारी (दि.5) जिल्हाभरातील कर्मचार्‍यांचा बँक बचाव मेळावा नाशिकमध्ये झाला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव यांनी सहकार चळवळीचे महत्त्व विशद करून सर्व सेवकांनी बँकेप्रति सकारात्मक व व्यावहारिक दृष्टीने कामकाज करून वैयक्तिक संबंधाचा वापर करून सेवकांनी बँकेस नावलौकिक प्राप्त करून द्यावा, असे आवाहन केले. कर्मचारीवर्गाने एकजुटीने कामकाज केल्यास बँकेस निश्चितपणे गतवैभव प्राप्त होईल. जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक असून, बँकेच्या सेवकांनी शेतकरी, सभासद व ठेवीदार सभासदांमध्ये बँकेविषयी विश्वास निर्माण करावा, असे सांगितले. प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृ संस्था म्हणून या बँकेने 68 वर्षे कामकाज केलेले आहे. ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सुविधा देण्यात जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे ग्रामीण शेती अर्थपुरवठ्याचा व्यवसाय करण्यात बँक कमकुवत झाली आहे. तसेच बँकेच्या काही ठेवी कमी झाल्या आहेत. यासाठी थकबाकीदार सभासदांनी थकबाकीची रक्कम भरून त्यांच्यावरील थकबाकीचा शिक्का नष्ट करावा, अशी बँकेची भावना असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ निकम म्हणाले की, जिल्हा बँक सध्या अडचणीत आहे. आशिया खंडातील नावाजलेली आपली बँक अनेक पुरस्कारप्राप्त मिळालेली बँक याच बँकेसाठी आज बँक बचाव मेळावा घ्यावा लागतो, याचे अत्यंत दु:ख वाटते. सहकाराच्या ब्रीदवाक्यानुसार आमचे सर्व सचिव बांधव बँकेसाठी सहकार्य करून बँकेस गतवैभव प्राप्त करण्यास मदत करतील. मेळाव्यास कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रदीप शेवाळे, उपाध्यक्ष साहेबराव पवार, मिलिंद देवकुटे, गोपीचंद निकम, नंदकुमार तासकर, खजिनदार सुभाष गडाख, सेक्रेटरी मिलिंद पगारे व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व सचिव बांधव, नाशिक जिल्हा सचिव संघटनेचे अध्यक्ष देवीदास नाठे, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गुंड, नाशिक जिल्हा बँकेतील जिल्ह्यातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभासद करून घेण्याचे आवाहन
बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याच्या दृष्टीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा बँकेचे नवीन वैयक्तिक सभासद करून घेण्याबाबत मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा बँकेने अटी व शर्तीनुसार नवीन वैयक्तिक सभासद करण्याबाबत कार्यवाही सुरू केलेली आहे. तरी सर्व कर्मचारीवर्गाने आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना सभासद करून बँकेच्या भागभांडवलात वाढ करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम appeared first on पुढारी.