नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत

दिव्यांग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र व चाचण्यांसाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींना मोठी कसरत करीत बाह्यरुग्ण विभागापर्यंत जावे लागत आहे. या दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने तसेच कर्मचार्‍यांकडूनही मदत मिळत नसल्याने नातलगांचा आधार घेत संबंधित कक्षापर्यंत जावे लागते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीसोबतच त्यांच्या नातलगांनाही शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

विभागात दोन व्हीलचेअर आणि दोन स्ट्रेचर आहेत. मात्र सुरुवातीला आलेले दिव्यांग बांधव व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरचा ताबा सोडत नाहीत. त्यामुळे इतर दिव्यांग बांधवांना अडचण होते. यावर लवकरच तोडगा काढू. -डॉ. उत्कर्ष दुधेडिया, जिल्हा रुग्णालय.

दिव्यांग व्यक्तींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात यावे लागते. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चाचणी, तपासणी करण्यासही रुग्णालयात यावे लागते. यावेळी काही दिव्यांगांना चालता येत नाही किंवा त्यांच्या हातात बळ नसते. त्यामुळे त्यांना दुसर्‍यांच्या मदतीची आवश्यकता असते. जिल्हा रुग्णालयात दिव्यांगाला बुधवारी व शुक्रवारी प्रमाणपत्र मिळते. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागत असल्याने दिव्यांग जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र रुग्णालयात येणार्‍या दिव्यांगांना मदत मिळत नसल्याने त्यांना स्वत:लाच कसरत करत तपासणीसाठी हेलपाटे मारावे लागतात.

दिव्यांगांना तपासणीसाठी येताना सोबतीला दोन व्यक्ती आणाव्या लागतात किंवा स्वत:च अडचणींवर मात करीत रुग्णालयात जावे लागते. प्रवेशद्वाराजवळ व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध झालेच पाहिजे. वेळ पडल्यास आंदोलन करू. – अनिल भडांगे, जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष.

दिव्यांग  www.pudhari.news

दिव्यांग विभागात व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मागच्याच आठवड्यात 100 टक्के दिव्यांग व्यक्तीला आम्ही चादरीत टाकून रुग्णालयात आणले होते. -दीपक शेवाळे, प्रदेश सरचिटणीस, दिव्यांग कल्याण संस्था.

The post नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत appeared first on पुढारी.