नाशिक : जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये पोहोचणार मोबाइलची रेंज

मोबाईल टॉवर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

फाइव्ह-जीच्या काळात मोबाइल रेंजपासून कोसो दूर असलेल्या जिल्ह्यातीवांमध्ये फोर-जी टॉवर उभारण्याची तयारी बीएसएनएलने केली आहे. बीएसएनएलच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने जागेची उपलब्धता करून दिली आहे. येत्या काही महिन्यांत या सर्व गावांमध्ये माेबाइलचा आवाज घुमणार आहे.

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक गावापर्यंत मोबाइल व इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार फाइव्ह-जीच्या काळातही मोबाइलची रेंज पोहोचली नसलेल्या दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून टॉवर उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, सुरगाणा, बागलाण, दिंडोरी, येवला व नांदगाव या तालुक्यांतील ६९ गावांची निवड करण्यात आली आहे. यासर्व गावांमध्ये माेबाइलचे टॉवर उभे राहणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक टाॅवरसाठी सुमारे दोन गुंठेंपर्यंत जागेची उपलब्धता बीएसएनलला करून दिली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी पट्ट्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात मोबाइलची नसल्याने स्थानिकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. इंटरनेटअभावी शासकीय कामांमध्ये सातत्याने व्यत्यय येत आहे. रेशन दुकानांमधून महिन्याकाठी धान्य वितरण करताना दुकानदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच फाइव्ह-जीची सुविधा उपलब्ध असतानाही या भागातील विद्यार्थ्यांना केवळ इंटरनेटअभावी ऑनलाइन शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. मात्र, या सर्व समस्यांवर आता तोडगा निघणार आहे. ६९ गावांमध्ये बीएसएनएल टॉवरला जागा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने २६ तसेच जिल्हा परिषदेच्या ४३ जागांचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच ही गावे भ्रमणध्वनीद्वारे जगाच्या संपर्कात येणार आहेत.

गावठाणातील ६९ ठिकाणी जागा

बीएसएनएल टॉवर उभारणीसाठी ६९ ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये सुरगाण्यात १९, त्र्यंबकेश्वरमध्ये १८, पेठला १४, कळवणला ८, बागलाणला ५, दिंडोरीत २, इगतपुरी, येवला व नांदगावमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये पोहोचणार मोबाइलची रेंज appeared first on पुढारी.