नाशिक : गुन्हेगारांची कौटुंबिक माहिती आता पोलिसांच्या रेकॉर्डवर

पोलिस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गंभीर गुन्हे टाळण्यासाठी किंवा गुन्हा घडल्यास त्याची उकल करण्यासाठी शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांची चौकशी सुरू केली आहे. यात आवश्यकतेनुसार गुन्हेगारांची घरझडती घेत ते सध्या कोणत्या स्वरूपाचा रोजगार, नोकरी करतात, त्यांची कौटुंबिक माहिती संकलित केली जात आहे.

शहरात चोरी, वाहनचोरी, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे घडत असून, त्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली आहे. तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मोक्का, तडीपार, स्थानबद्ध आदी कारवाई केली जात आहे, तर पोलिस ठाणेनिहाय कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची शोधमोहीम केली जात असते. दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त आनंदा वाघ, शेखर देशमुख यांच्या पथकांनी परिमंडळ दोनमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलिसांच्या हद्दीत सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत धडक कारवाई केली. त्यात दुचाकी चोरी, चोरी, जबरी चोरीतल्या संशयितांची माहिती घेत त्यांची घरझडती घेतली. संशयित कोणती नोकरी, व्यवसाय करतात, कुटुंबातील इतर नातलगांची पार्श्वभूमी, त्यांच्या कामाचे स्वरूप, मोबाइल क्रमांकासह इतर महत्त्वाची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे आधी घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न पथके करीत आहेत. तसेच भविष्यात संबंधित माहितीद्वारे संशयितांकडे चौकशी करून गुन्हे प्रतिबंध करण्याबाबतचे निर्देश पथकांना देण्यात आले आहेत.

अशी केली कारवाई

सायंकाळी केलेल्या कारवाईत ३७ गुन्हेगारांची घरझडती घेतली. तसेच ३१ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, दारू, गुटखा सेवन करणाऱ्या १८ जणांवर कोटपा कारवाई करण्यात आली आहे, तर ३ बेशिस्त चालकांकडून १२०० रुपयांचा दंड वसूल केला असून, १२ संशयितांना समन्स, वॉरंट बजाविले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गुन्हेगारांची कौटुंबिक माहिती आता पोलिसांच्या रेकॉर्डवर appeared first on पुढारी.