नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन

चार्जिंग स्टेशन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या जिल्ह्यातील मुंबई- आग्रा महामार्गावरील दोन चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नव्याने आणखी पाच चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. भविष्यात वाहनधारकांसाठी हे स्टेशन उपयुक्त ठरणार आहेत.

प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची मोठी गरज भासणार आहे. हीच गरज ओळखून महावितरणने शहरानजीक पाथर्डी व वाडीव-हे उपकेंद्रात स्टेशन उभारले आहेत. या स्टेशनचे काम पूर्ण झाले असून, ते कोणत्याही क्षणी कार्यान्वित करण्याची तयारी महावितरणने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना त्यांची वाहने चार्जिंग करण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या विचारात घेता आणखी पाच चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आहे. मुंबई- आग्रा महामार्गाच्या बाजूला हे स्टेशन उभे केले जाऊ शकतात. त्यासाठी इगतपुरी शहर व आसपास किंवा मालेगाव ते धुळ्याच्या बाजूकडेही स्टेशन उभे करण्यासाठी महावितरणकडून सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती मिळते. दरम्यान, येत्या काळात ही चार्जिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांना त्यांची इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे.

समृद्धी’ वर सर्वेक्षण :

महावितरण समृद्धी एक्स्प्रेस-वेवर इगतपुरी ते शिर्डीदरम्यान दोन्ही बाजूला वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बांधणार आहेत. हे स्टेशन्स उभारण्यासाठी सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. तेथील चार्जिंग पोर्टवर मोटारचालकाला प्रथम कार्ड स्वाइप करत विजेसाठीचे आवश्यक ते पैसे अदा करावे लागतील. त्यानंतर चार्जिंग पोर्टची संख्या वाढविण्याचा महावितरणचा मानस आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : महावितरण उभारणार आणखी पाच चार्जिंग स्टेशन appeared first on पुढारी.