नाशिक जिल्ह्यात पावसाची दडी, टँकरची संख्या पोहोचली साठीवर

पाण्याचा टॅंकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात पाच टँकर वाढून ही संख्या ६० वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता येत्या काळात टँकरच्या मागणीत अधिक वाढ होऊ शकते.

पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत

अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने आखडता हात घेतला आहे. मान्सूनचे तीन महिने संपुष्टात येत असताना, अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्याबरोबरच ग्रामीण भागाला आता दुष्काळाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी गावोगावीचे पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रशासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा वेळ टँकरच्या प्रतीक्षेत वाया जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडून सात तालुक्यांत ७५ गावे आणि ६२ वाड्या अशा १३७ ठिकाणी ६० टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टँकरच्या १४२ फेऱ्या होत आहेत. येवला तालुका टंचाईच्या सर्वाधिक छायेत आहे. तालुक्यात ४४ गावे-वाड्यांना १६ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल मालेगाव व चांदवडमध्ये प्रत्येकी १२, तर नांदगावी ११ टँकर सुरू आहेत. देवळ्यात चार, बागलाणला तीन व सिन्नरमध्ये दोन टँकर धावताहेत. दरम्यान, प्रशासनाने पाण्यासाठी ४२ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये गावांना पाणीपुरवठ्यासाठी २५ विहिरी अधिग्रहित केल्या असून, उर्वरित विहिरींवरून टँकर भरून गावोगावी पाणी पुरविले जात आहे.

———–

टँकरची स्थिती

तालुका संख्या गावे

येवला १६ ४४

मालेगाव १२ २१

चांदवड १२ २३

नांदगाव ११ ३४

देवळा 0४ 0६

बागलाण 0३ 0७

सिन्नर ०२ ०२

——-०——–

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची दडी, टँकरची संख्या पोहोचली साठीवर appeared first on पुढारी.