सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता यांच्यासोबतचे एका फार्मवरचे फोटो व नाचगाणे करतानाचा व्हिडीओ दाखवत आमदार नितेश राणे व पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत बडगुजर यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर नाशिकमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिंदे गटाने बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत (राजू) लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मायको सर्कल येथील पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बडगुजर यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. सलीम कुत्ता समवेत बडगुजर हे ‘मैं हूं डॉन’ या गाण्यावर डान्स करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून दहशत माजविणाऱ्याला पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देतांनाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. बडगुजर यांची तातडीने चौकशी व्हावी, २५७ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांचे स्वागत सुधाकर बडगुजर का करत होते ? त्याच्या सोबत नाचतात. हेच यांचे बेगडी हिंदुत्व आहे का ? नाशिककरांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी शिंदे गटाकडून करण्यात आली.

यावेळी सिद्धेश अभंगे, नितीन लांडगे, मंगला भास्कर, हर्षदा गायकर, योगिता ठाकरे, योगेश बेलादर, रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, दिगंबर नाडे, मंगेश करंजकर, अमोल सूर्यवंशी, रोशन शिंदे, आनंद फरताळे, अभय महादास, कैलास जाधव, मनीष खेले, उमेश चव्हाण, आदित्य बोरस्ते, संदेश लवटे, ओमकार चव्हाण, आकाश पवार, राहुल वारुळे, मिलिंद मोरे, आकाश कोकाटे, अमेय जाधव, ओंकार कंगले, नरेंद्र शेखावत, श्रावण पवार, जॉर्ज वरशाला, मयूर तेजाळे, किरण राक्षे आदी उपस्थित होते.

राणेंविरोधातील आंदोलन फसले

आ. राणे यांनी विधानसभेत बडगुजर यांच्यावर आरोप करत चौकशीची मागणी केल्यानंतर बडगुजर यांनी काही तासातच शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत आरोप धुडकावून लावले. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. या कार्यकर्त्यांनी बडगुजर यांना केवळ राजकीय सुडापोटी या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप करत राणे व भुसे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पक्ष कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतू, पोलिसांनी आ. राणे यांची प्रतिमा ताब्यात घेतल्याने ठाकरे गटाचे आंदोलन फसले.

 भाजपचीही निदर्शने

शिंदे गटापाठोपाठ भाजपने देखील बडगुजर यांच्याविरोधात रविवार कारंजा येथे जोरदार निदर्शने केली. नाशिक शहर ही देवभूमी आहे, संत भूमी आहे. एकीकडे नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी देशद्रोहाचा गुन्हा असलेल्या आरोपींसोबत स्नेहसंबंध प्रस्थापित करणे निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिधकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी भाजपा शहर सचिव अमित घुगे, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, माजी सभागृह नेते सतीश सोनवणे, सुजाता करजगीकर, उत्तम उगले, बापू शिंदे, अनिता भामरे, सागर शेलार, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, पवन उगले, महेश सदावर्ते, मीनल भोसले, संदीप शिरोळे, अक्षय गांगुर्डे, विनोद येवले, विक्रांत गांगुर्डे, सचिन मोरे, विजय गायखे, तुषार नाटकर, आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.