‘टास्क’ पूर्ण करण्याच्या मोबदल्यात ६५ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाईन स्वरुपात पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील नऊ जणांना ‘टास्क’ पूर्ण करण्याच्या मोबदल्यात उत्पन्न देण्याच्या बहाण्याने तब्बल ६५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Online Part Time Job)

प्रशांत अहिरे (रा. पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह इतर आठ जणांना गत ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान, भामट्यांनी गंडा घातला. भामट्याने प्रशांत यांच्यासह इतरासोबत व्हॉटसॲपवरून संपर्क साधला होता. संशयिताने प्रशांत व इतरांना ऑनलाईन पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगली आर्थिक कमाई होत असल्याचे आमिष दाखविले. यासाठी भामट्याने नाशिकच्या युवकांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीस त्यांना ऑनलाईन टास्क दिले. ते टास्क पुर्ण केल्यानंतर भामट्याने काही पैसे युवकांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर पुर्ण केलेल्या टास्कच्या मोबदल्यातील पैसे पोर्टलवर दाखवले मात्र ते बँक खात्यात जमा केले नाही. हे पैसे पाहिजे असल्यास नविन टास्क पुर्ण करा व त्यासाठी पैसे द्या असे भामट्याने सांगितले. (Online Part Time Job) त्यानुसार प्रशांत व इतर आठ जणांनी भामट्याने सांगितल्यानुसार वेळोवेळी ६४ लाख ६८ हजार ३६९ रुपये दिले. मात्र भामट्याने त्यांना पैसे दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करीत युवकांशी संपर्क साधणाऱ्यांसह ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post 'टास्क' पूर्ण करण्याच्या मोबदल्यात ६५ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.